नवी दिल्ली : राष्ट्रगीतातून काही शब्द काढून टाकायची मागणी सुरु झाली आहे. सिंध हा शब्द राष्ट्रगीतातून काढावा अशी मागणी दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सिंधऐवजी नॉर्थ-ईस्ट शब्दाचा समावेश राष्ट्रगीतात करण्यात यावा, असं बोललं गेलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे नेते आणि हरियाणा सरकारमधले मंत्री अनिल विज यांनीही या मागणीचं समर्थन केलं आहे. याचबरोबर राष्ट्रगीतातून अधिनायक हा शब्दही वगळण्यात यावा, असं अनिल विज म्हणालेत. अधिनायक शब्दाचा अर्थ हुकूमशहा आहे आणि आता भारतामध्ये कोणीही हुकूमशहा नाही, अशी प्रतिक्रिया अनिल विज यांनी दिली आहे.


भारतात कोणीही अधिनायक नाही


अधिनायक हा शब्द भारतातल्या लोकशाही आणि संस्कृतीविरुद्ध आहे. भारत हा लोकतांत्रिक देश आहे. या देशात अधिनायक शब्दाचा वापर करणं योग्य नाही, असं अनिल विज यांना वाटतंय.


काँग्रेसनं केली सिंध शब्द हटवण्याची मागणी


राष्ट्रगीतातून सिंध हा शब्द हटवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस खासदार रिपुन बोरा यांनी केली होती. सिंधऐवजी उत्तर-पूर्व शब्द जोडण्यात यावा, असं बोरा म्हणाले. राज्यसभेमध्ये बोरा यांनी ही मागणी केली. सिंध हा शब्द अजूनही राष्ट्रगीतात वापरला जातो. सिंध आता भारतात नाही तर पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तान आणि भारताचे संबंध कसे आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, असं बोरा म्हणाले.


शिवसेनेनंही केली होती बदलाची मागणी


याआधी २०१६ साली शिवसेनेनंही राष्ट्रगीतामध्ये बदल करण्याची मागणी केली होती. सिंध हा शब्द राष्ट्रगीतातून काढण्यात यावा. सिंध हे पाकिस्तानमध्ये आहे आणि त्याचं आम्ही गुणगान गात आहोत, असा आक्षेप शिवसेनेनं घेतला होता.