नवी दिल्ली : आज देशभारत १५०वी गांधी जयंती साजरी करण्यात येत आहे. आजपासून देशभरात एकदाच वापरण्याजोग्या येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घातल्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत घोषणा केली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी सिंगल यूज प्लास्टिकच्या (Single Use Plastic) वापरावर बंदी घालण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकपासून तयार करण्यात येणारे चहाचे कप, पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंकची बाटली आणि कोल्ड ड्रिंकमधील स्ट्रॉवर बंदी घालण्यात आली आहे. सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करताना आढळल्यास दंड आकारण्यात येणार आहे. हे प्लास्टिक पर्यावरणाला धोकादायक आहेच शिवाय हे रिसायकलही होत नाही.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२२ पर्यंत भारताला सिंगल यूज प्लास्टिकमुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात त्यांनी जनतेला सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन केले होते. याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी गांधी जयंतीपासून सुरुवात करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे आजपासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे.


जगभरात पर्यावरणीय वातावरणाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. प्लास्टिक आणि पॉलिथिन पिशव्यांनी वातावरण सर्वाधिक प्रदूषित केले आहे. 


लियो बॅकलँड (Leo Baekeland) यांना प्लास्टिकचे जनक मानले जाते. त्यांनी वयाच्या ४३व्या वर्षी फिनॉल आणि फार्मल डीहाइड नावाच्या रसायनांवर प्रयोग करताना एका नव्या पदार्थाचा शोध लावला. या प्रयोगादरम्यान त्यांनी, कमी खर्चात तयार होणाऱ्या प्लास्टिकचा शोध लावला. 


देशात ६०च्या दशकांत प्लास्टिक वापरात आले. प्लास्टिक आल्यानंतर याच्या चांगल्या-वाईट परिणामांवर वाद-विवाद सुरु होण्यास सुरुवात झाली.


प्लास्टिक आरोग्य आणि पर्यावरण दोघांसाठी नुकसानकारक आहे. प्लास्टिक बनण्याच्या प्रक्रियेपासून ते त्याच्या वापरापर्यंत  याचा अतिशय वाईट परिणाम होताना दिसतो. प्लास्टिक, पेट्रोलियमपासून तयार झालेल्या रसायनांपासून बनविले जाते त्यापासून निघणारा विषारी वायू आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतो. 


प्लास्टिक पाण्यालाही प्रदूषित करते. प्लास्टिक उत्पादनावेळी नको असलेले पदार्थ जलस्त्रोतांमध्ये मिसळले जातात आणि हेच जल प्रदूषणाचे कारण ठरते.


या प्लास्टिक उत्पादनांवर बंदी -


- ५० मायक्रोनहून कमी पिशव्या
- पिशव्यांमधील सीलबंद पाण्याचे पाकिट
- २०० मिलीलिटरच्या बाटल्या
- सिंगल यूज डिस्पोजल सामान
- प्लास्टिकचे डिस्पोजल डब्बे आणि स्ट्रॉ
- प्लास्टिक, थर्माकोलचे सजावटीचे सामान