नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) १९८४ च्या शीख दंगल प्रकरणातील सात खटले पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या खटल्यातील आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले असेल तरीही हे खटले पुन्हा सुरु होतील, असे एसआयटीकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या सात खटल्यांमधील पाच आरोपींना कमलनाथ यांनी आश्रय दिल्याचे सांगितले जाते. मात्र, कमलनाथ यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, त्यांनी पाच आरोपांनी आश्रय दिला होता. पुराव्याअभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 


हे खटले पुन्हा सुरु झाल्यास एसआयटीसमोर दोन साक्षीदार हजर होतील. ते शीख दंगलीतील कमलनाथ यांच्या सहभागाविषयी सर्व काही सांगतील, असा दावा दिल्लीतील आमदार मजिंदर सिंग सिरसा यांनी केला.


मात्र, कमलनाथ यांनी नेहमीच शीख दंगलीत सहभागी असल्याचा आरोप फेटाळला आहे. काँग्रेसने त्यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी मध्यप्रदेश आणि पंजाबमध्ये निदर्शने करण्यात आली होती. 


कमलनाथ यांनी सज्जन कुमार आणि जगदीश टायटलर यांच्यासह जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप आहे. काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कमलनाथ यांनी दिल्लीच्या रकाबगंज गुरुद्वाराच्या परिसरात जमावाला चिथावणी दिली. या जमावाने अनेक शिखांची हत्या केली होती. मात्र, कमलनाथ यांनी आपण त्याठिकाणी जमावाला शांत करण्यासाठी गेल्याचा दावा केला होता. गेल्यावर्षी दिल्ली उच्च न्यायालयाने शीख दंगलप्रकरणात ८८ जणांची शिक्षा कायम ठेवली होती.