उन्नाव बलात्कार आरोपीचे खासदार साक्षी महाराजांनी मानले आभार
`गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीनंतर धन्यवाद देण्यासाठी त्यांची भेट घेतली`
नवी दिल्ली : उन्नावचे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी बुधवारी बहुचर्चित अशा उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याची सीतापूर तुरुंगात जाऊन भेट घेतली. अर्थातच, याबद्दल खासदार महाशयांना काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली. 'कुलदीप सिंह सेंगरची भेट घेण्याचं कारण काय?' असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता 'आपण कुलदीपचे आभार मानण्यासाठी त्यांची भेट घेतली' असं उत्तर साक्षी महाराजांनी दिलंय.
कुलदीप सिंह सेंगर याच्यावर एका तरुणीवर बलात्काराचा आरोप आहे. इतकंच नाही तर कुलदीपवर पीडितेच्या वडिलांच्या हत्येचाही आरोप आहे. पीडितेनं जून २०१७ मध्ये सेंगरवर सामूहिक बलात्काराचा आरोप केल्यानंतर तिच्यावर आणि तिच्या वडिलांवर हे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. आपले वडील पप्पू सिंह यांना मारहाण करण्यात आली तसंच एका खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली. ८ एप्रिल रोजी तुरुंगातच रक्ताच्या उलट्यांनंतर पप्पू सिंह यांचा मृत्यू झाला होता.
हे प्रकरण समोर आल्यानंतरही आमदार असलेल्या कुलदीप सेंगरवर कुठलीही कारवाई होत नसल्यानं नैराश्यग्रस्त अवस्थेत पीडित तरुणीनं न्यायासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला. परंतु, अलाहाबाद उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून पोलिसांना फटकारल्यानंतर भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना अटक झाली होती.
भेटीबद्दल विचारण्यात आलेल्या उत्तर देताना साक्षी महाराज यांनी 'गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीनंतर धन्यवाद देण्यासाठी त्यांची भेट घेतली' असं म्हटलंय.