लग्न म्हटलं की विधींपासून ते जेवणापर्यंत सगळं नीट व्हावं आणि येणाऱ्या पाहुण्यांना तक्रारीची संधी मिळू नये यासाठी कुटुंबांचा प्रयत्न असतो. वधू आणि वर दोन्ही बाजूंची कुटुंब अनेकदा आपल्या आयुष्यभराची कमाई मुलांच्या लग्नात खर्च करत असतात. पण लग्नात येणारे पाहुणे पूर्णपणे आनंदी होणं याची शक्यता कमीच असते. पण एखादी गोष्ट कमी पडली म्हणून हाणामारी झाल्याचं तुम्ही कधी ऐकलं किंवा पाहिलं नसेल. पण उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे असा प्रकार घडला आहे. चक्क रसगुल्ले कमी पडले म्हणून लग्नात हाणामारी झाली. या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आग्रा येथील फतेहाबाद तहसीलच्या शमसाबाद येथे ही घटना घडली आहे. शमसाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल शर्मा यांनी सांगितलं की, बृजभान कुशवाह यांच्या घरी लग्नाचा कार्यक्रम होता. याचवेळी एका व्यक्तीने रसगुल्ले कमी असल्याची कमेंट केली. त्याने केलेल्या या कमेंटवरुन वाद इतका वाढला की, लग्नात मारहाण सुरु झाली. यावेळी 6 लोक जखमी झाले. 


पोलिसांच्या माहितीनुसार जखमी झालेल्यांची नावं भगवान देवी, योगेश, मनोज, कैलाश, धर्मेंद्र आणि पवन अशी आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात एत्मादपूर येथे एका लग्नात मिठाई कमी असण्यावरुन झालेल्या वादात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 


दरम्यान 2014 मध्ये कानपूर देहात गावात असंच एक प्रकरण समोर आलं होतं. येथे उन्नाव गावातून वरात आली होती. लग्नात नवऱ्याच्या भावाने दोन रसगुल्ले प्लेटमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. पण मुलीच्या बाजूने असणाऱ्या एका व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला एकच रसगुल्ला दिला जाणार असल्याचं सांगितलं. यावरुन झालेला वाद नंतर हाणामारीपर्यंत पोहोचला. 


मुलीचा लग्नासाठी नकार


14 एप्रिलला 25 वर्षीय शिवकुमारची वरात आली तेव्हा सगळं काही सुरळीत होतं. पण नंतर रसगुल्ल्यावरुन झालेल्या भांडणानंतर लग्नच तुटलं. वाद इतका वाढला की, वराती आणि कुटुंबीय भिडले होते. नवरामुलगा आणि नवरीमुलीच्या कुटुंबीयांनी एकमेकांना शिव्या घातल्या. मुलीला याबद्दल समजलं असता तिने लग्नच मोडून टाकलं. 


हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. नंतर मुलीच्या कुटुंबाने चारचाकी न दिल्याने लग्न मोडल्याची तक्रार दिली.