मुंबई : गुरुवार आणि शुक्रवारी रात्री तुम्ही एक विशेष प्लॅन करू शकता. आकाशातून उल्कावर्षाव पाहण्याची मस्त पर्वणी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे गुरुवार आणि शुक्रवारची रात्र ताऱ्यांच्या साथीनं साजरी करता येणार आहे. आकाशातून पृथ्वीवर झेपावणाऱ्या उल्कांचा दरवर्षी डिसेंबर महिन्यात सोहळा रंगतो. 3200 फेथन धूमकेतू हा उल्कावर्षाव घडवणार आहे. तो ज्या मार्गानं गेला त्या मार्गानं मिथून रास अवकाशात दिसते. त्यामुळे मिथून राशीतून उल्कावर्षाव होणार आहे, असं म्हटलं जातंय.  3200 Phaethon नावाचा धूमकेतू साधणारपणे 5.8 किमी लांबीचा आहे. त्याला रॉकेट कॉमेट असंही म्हणतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा धूमकेतू सूर्याभोवती नियमित प्रदिक्षणा घालत असतो आणि तो पृथ्वीच्या कक्षेला छेदत असतो. त्यामुळे योगायोगानं दरवर्षी डिसेंबर महिन्यात उल्कावर्षाव पाहायला मिळतो. हा धूमकेतू सुमारे 19.9 किमी प्रति सेकंद या वेगानं धावतो. सूर्याच्या जवळ जाताना उष्णतेमुळे तो त्याचे अवशेष अर्थात धूलिकण किंवा लघुग्रह मागे टाकत जातो. पृथ्वीच्या कक्षेतल्या गुरुत्वाकर्षणामुळे हे धूलिकण पृथ्वीकडे खेचले जातात. वातावरणाच्या पट्ट्यात आल्यावर जळून नष्ट होतात. त्यालाच आपण उल्कावर्षाव म्हणतो. साधारण तासाला 50 उल्का पडतांना दिसतील असा अंदाज आहे.


वर्षभरात 10 ते 12 उल्कावर्षाव होत असतात. पृथ्वी धूमकेतूच्या कक्षेत आली की हा उल्कावर्षाव होतो. लघुग्रहांचे तुकडे पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच पेट घेतात त्यामुळे ते उल्का तेजस्वी दिसू लागतात .


चंद्र मावळल्यानंतर हा उल्कावर्षाव आणखी गडद दिसणार आहे. कुडकुडत्या थंडीच्या साथीनं या उल्कावर्षावाचा आनंद घ्या. उल्कावर्षावाचा जर तुम्हाला मनमुराद आनंद लुटायचा असेल तर शहरापासून दूर अंधाराच्या ठिकाणी जा. या ठिकाणी तुम्हाला उल्कावर्षाव पाहायला मिळेल. एखाद्या टेकडीवर किंवा डोंगरावरुन तो अजून स्पष्ट दिसेल.