मुंबई : सीसीडीचे मालक व्ही.जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता झाल्यानंतर बुधवारी सकाळी नेत्रावती नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह सापडला. ७२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांनी आत्महत्या केल्याचं आता स्पष्ट झालं. आहे. कर्नाटक पोलिसांनी अनेक तासांपासून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारपासूनच सिद्धार्थ बेपत्ता झाल्याची माहिती हाती येताच कर्नाटक पोलिसांनी शोधमोहिम हाती घेतली होती. नेत्रावती नदीच्या पात्रात नौकादलही त्यांच्या शोधासाठी पाठवण्यात आलं होतं. सकलेशपूरच्या वाटेवर असताना सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी कारचालकाला कार मंगळुरूच्या दिशेने वळवण्यास सांगितली आणि उल्लाल येथे ते नदीच्या पुलापाशी कारमधून उतरले. तेव्हाच त्यांना अखेरचं पाहिलं गेलं होतं. 


सिद्धार्थ बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर येताच काही तासांनी त्यांनी सीसीडीचं संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेलं एक पत्र हस्तगत करण्यात आलं. ज्यामध्ये त्यांनी एका चांगल्या व्यवसायाचा आराखडा न उभारता आल्याची खंत व्यक्त केली होती. आपण परिस्थितीचा सामना केला. पण, अखेर याच परिस्थितीपुढे हतबल होत आपल्याला हात टेकावे लागत असल्याची स्वीकृती त्यांनी दिली. 


दरम्यान, सोमवारी एका मासेमाराने सिद्धार्थ यांच्याप्रमाणेच दिसणाऱ्या एका इसमाला पुलावरून नेत्रावती नदीच्या पाण्यात उडी मारताना पाहिलं असल्याचं म्हटलं जात आहे. आर्थिक व्यवहार प्रकरण आणि आयकर विभागाकड़ून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. याप्रकरणीचा तपास सध्या सुरु असून, लवकरच सर्व चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.