मुंबई :  सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून टिक- टॉकची बरीच चलती पाहायला मिळाली आहे. विविध चित्रपटगीतांच्या आधारे अभिनय करत एखादा व्हिडिओ साकारत तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा आणि त्याआधारे प्रसिद्धीझोतात यायचं, असा अनेकांचाच यामागचा हेतू. पण, यालाही काही मर्यादा असाव्यात असंच अनेकांचं म्हणणं होतं. थेट न्यायालयापर्यंत गेलेल्या या टिक- टॉक प्रकरणाला आता एक वेगळं वळण आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडिओ. ज्यामध्ये एक लहान मुलगी तिला अर्थही समजत नसणाऱ्या गाण्यावर हावभाव करत आहे, अभिनय करत आहे. पण, खरंच प्रसिद्धीसाठी या अशा मार्गांचा अवलंब केला जाण्याची गरज आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'दिवानी हूँ तेरी तू अपना बना ले....' असे बोल असणाऱ्या गाण्यावर ती चिमुरडी अभिनय करताना दिसत आहे. सुरुवातीला तिच्या डोळ्यांत अश्रू तरळलेले दिसतात. तर, पुढे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटतं. मुळात गाण्यातल्या या शब्दांचा अर्थही या मुलांना कळणारा नाही, अशा या अजाणत्या वयात अशा प्रकारचे हावभाव करून घेणं कितपत योग्य आहे? असाच प्रश्न अनेकांकडून आता उपस्थित करण्यात येत आहे. 


व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून उपस्थित होणारा आणखी एक प्रश्न म्हणजे ही चिमुकली रडतेय ती खरंच रडतेय की त्यासाठी ग्लिसरीनचा वापर करण्यात आलाय हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लहानग्यांचे असे व्हिडिओ तयार करणाऱ्या पालकांची मानसिकता नेमकी असते तरी काय, असे व्हिडिओ पोस्ट करण्यात येतातच का, हाच एक अनुत्तरित प्रश्न आहे.