स्टेट बँकेचा ग्राहकांना अलर्ट, SMS मिळाल्यास त्वरीत बँकेशी करा संपर्क
देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिलाय.
मुंबई : देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिलाय. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्याची शेवटची तारीख जसजशी जवळ येतेय. तसे लोकांना इंटरनेटच्या माध्यमातून जाळ्यात फसवण्याचे प्रयत्न होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून करदात्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नावे एसएमएस पाठवले जातायत. यात रिफंड मिळवून देतो, असे सांगत ग्राहकांकडून बँकेची माहिती मागितली जात आहे. मात्र, असा एसएमएसला तुम्ही भुलू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अशा प्रकारची कोणतीही माहिती एसएमएसच्या माध्यमातून मागवत नाही. चोर ग्राहकांची व्यक्तिगत माहिती चोरून गंडा घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ग्राहकांना सतर्क राहण्याच्या सूचना एसबीआय बँकेकडून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या एसएमएसला दुर्लक्षित करा किंवा त्यांना ब्लॉक करा. पण त्यांना कोणतीही माहिती देऊ नका. जर तुम्ही कोणाला एसएमएसच्या माध्यमातून स्वतःची खासगी माहिती दिल्यास तात्काळ बँकेशी संपर्क साधा, असे आवाहनही बँकेने केले आहे.
बँकेने यासंदर्भात एक व्हिडिओही सोशल मीडियावर अपलोट केलाय. त्यात तुम्हाला आलेल्या एसएमएसवरच्या लिंकवर क्लिक केल्यास तो तुम्हाला भलत्याच वेबसाइटवर घेऊन जातो आणि तुमची खासगी माहिती मागतो, असे या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेय. तुम्ही तुमची व्यक्तिगत माहिती दिल्यास ते तुमचं अकाऊंट चोरांकडून रिकामी केले जाऊ शकते.