राष्ट्रीय अध्यक्षांची उद्घाटनासाठी उपस्थिती, दुसरीकडे समर्थकांची नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी; VIDEO व्हायरल
लोक नाश्ता लुटून नेत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गर्दीत काही लोकांची पाकिटंही चोरण्यात आली.
बिहारच्या आरा येथे रामबिलास पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान शुक्रवारी एका मॉलच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. पण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात लोक अक्षरश: नाश्त्यावर तुटून पडले होते. लोकांनी नाश्ता लुटून नेला. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत. तसंच फेसबुक आणि इतर ठिकाणी या व्हिडीओवर एकच चर्चा रंगली आहे.
व्हायरल झालेला व्हिडीओ आराच्या कोइलवर प्रखंड येथील असल्याचं समजत आहे. कोइलवर बाजारात एका इलेक्ट्रॉनिक मॉलच्या उद्घाटनासाठी लोकजनशक्ती पार्टी (रामबिलास) अध्यक्ष चिराग पासवान पोहोचले होते. या कार्यक्रमात इलेक्क्ट्रॉनिक मॉलच्या संचालकाचे पाहुणे आणि चिराग पासवान यांचे समर्थकही दाखल झाले होते.
या कार्यक्रमात एकीकडे चिराग पासवान उद्घाटन केल्यानंतर भाषण देत असताना, दुसरीकडे कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना नाश्त्याचं वाटप केलं जात होतं. यानंतर मात्र एकच गोंधळ सुरु झाला होता. नाश्ता आल्याचं दिसताच लहान मुलं, म्हातारे, तरुण सगळेजण त्याच्यावर तुटून पडले. नाश्ता घेण्यासाठी जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती.
हा गोंधळ पाहिल्यानंतर घाईतच कार्यक्रम संपवण्यात आला. यानंतर चिराग पासवान यांना पुन्हा पाटण्याला परत पाठवण्यात आलं. पण यावेळी काही लोकांनी मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला होता. लोक नाश्त्यासाठी चेंगराचेंगरी करत असल्याचा आणि लुटून नेत असल्याचा व्हिडीओ यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकजम आपापल्या ट्विटर आणि फेसबुक अकाऊंटला हे व्हिडीओ शेअर करत आहेत. दरम्यान या गर्दीचा फायदा घेत काहीजणांची पाकिटंही लुटण्यात आली असं सांगितलं जात आहे.
चिराग पासवान यांच्या कार्यक्रमात एकीकडे नाश्ता लुटला जात असताना, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी या इलेक्ट्रॉनिक मॉलचं उद्घाटन बिहारी फर्स्ट-बिहारी फर्स्ट या हिशोबाने करण्यात आल्याचं सांगितलं. उद्योजकांना प्रोत्साहित करणं आपल्या सगळ्याचं काम आहे असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्यावरही टीका केली. लालू वादग्रस्त विधानं करत असल्याने विरोधी पक्षांना त्याचं नुकसान होत आहे. आता असंही लालू आपण एकदम बरे झाल्याचं सांगत आहेत. त्यामुळे त्यांना आता जामीनावर बाहेर ठेवण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलं.