नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Delhi) चोरीचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) गुन्हे आटोक्यात आल्याचा दावा केला असला तरी चोरीच्या घटना कमी झालेल्या नाहीत, हेच या घटनेवरुन सिद्ध झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतल्या शालीमार बाग परिसरात गुरुवारी संध्याकाळी दुचाकीवरुन आलेल्या गुन्हेगारांनी एका महिलेच्या हातातला मोबाईल हिसकावून (Mobile Snatching) नेल्याची घटना घडली. या महिलेने मोबाईल न सोडल्याने आरोपींनी या महिलेला दुचाकीबरोबर चक्क १५० मीटर फरफटत नेलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला पायी जात होती. त्याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी महिलेच्या हातातला मोबाईल हिसकावला. महिलेने दुचाकीवर मागे बसलेल्या आरोपीचं जॅकेट पकडलं, पण आरोपींनी या महिलेला फरफटत नेलं. 


या घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. पीडित महिला शालीमार परिसरातील एका खासगी रुग्णालयात काम करते. याच रुग्णालयात महिलेवर आता उपचार सुरु आहेत. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.



आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे.