शिमला : शिमला येथे सध्या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांची चांगलीच कोंडी झाली आहे. या बर्फवृष्टीमुळे ठिकठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. १८७ पर्यटक एकाच जागी अडकून पडले होते. त्यांना पोलिसांनी सुखरूप बाहेर काढलं. रस्त्यावर बर्फ साचल्यामुळे गाड्या चालवणं ही अवघड झालं आहे. बर्फवृष्टीत अडकलेल्या ३१ गाड्या स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने बाहेर काढल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे शिमला-हमीरपूर महामार्गावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने फसलेल्या पर्यटकांना उशिरा रात्रीपर्यंत सुरक्षित स्थळी हलवलं. हवामानाची माहिती घेतल्यानंतरच बाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.


बर्फवृष्टीमुळे शिमला-कुफरी महामार्गावर गाड्या घसरत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रात्री अनेक पर्यटकांना चालत हॉटेलपर्यंत पोहोचावं लागलं.


बर्फवृष्टीमुळे तापमान ३ अशांपर्यंत खाली आलं होतं. २० जानेवारीपासून पुन्हा एकदा असंच हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांना हवामानाचा अंदाज घेतच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.