दिल्लीत जोरदार पाऊस; नोएडात पसरली बर्फाची चादर
दिल्लीतील जनजीवन विस्कळीत
दिल्ली : दिल्ली एनसीआरमध्ये गुरूवारी रात्री हवामानात कमालीचा बदल झाला. दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसाने हजेरी लावली. नोएडामध्ये मोठ्या गारा पडल्या असून अनेक ठिकाणी गारांची चादर पसरली आहे. हवामानातील या बदलामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीत खराब हवामानामुळे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे चार्टर विमान आणि दिल्ली येथे उतरणाऱ्या विविध १५ विमानांचे उड्डाण रद्द करून ते जयपूर येथे वळविण्यात आले आहे.
या अचानक बदललेल्या हवामानामुळे सोशल मीडियावर नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या गारांचा फोटो शेअर करत हे दिल्ली नसून शिमला झाले असल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमध्येही गेल्या दोन दिवसांपासून खराब हवामान सुरू आहे. पुढील २४ तासांत बर्फवृष्टी राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.