खुशाल रस्त्यावर उतरा; ज्योतिरादित्य शिंदेंना कमल नाथांचे प्रत्युत्तर
कमल नाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील वादाची माहिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही देण्यात आली आहे.
भोपाळ: मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात शनिवारी शाब्दिक वाद रंगताना पाहायला मिळाला. ज्योतिरादित्य यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीरनाम्यात शिक्षकांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही तर रस्त्यावर उतरू, असा इशारा कमल नाथ सरकाला दिला होता.
या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, यावेळी वाद इतका विकोपाला गेला की, ज्योतिरादित्य शिंदे ही बैठक अर्ध्यावरच सोडून निघून गेले. यानंतर कमल नाथ बैठक संपवून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले. यावेळी त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांनी रस्त्यावर उतरण्याच्या दिलेल्या इशाऱ्याविषयी कमल नाथ यांना विचारणा केली. तेव्हा कमल नाथ यांनीही रागातच 'मग उतरा', असे उत्तर दिले.
त्यामुळे आगामी काळात मध्य प्रदेश काँग्रेसमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारानंतर राज्यातील काँग्रेसचे इतर नेते डॅमेज कंट्रोलच्या कामाला लागले आहेत. कमल नाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील वादाची माहिती पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही देण्यात आली आहे.
तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रसारमाध्यमांसमोर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी म्हटले की, संपूर्ण काँग्रेस पक्ष ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत आहे. आम्ही सर्वांनी मिळून जाहीरनाम्यात आश्वासने दिली होती. पाच वर्षात कमल नाथजी ही सर्व आश्वासने पूर्ण करतील. यापैकी बहुतांश आश्वासने पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरु असल्याचा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.