बंगळुरुमध्ये 10 वर्षाच्या मुलाने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरशी छेडछाड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री कामावरुन घऱी परतत असताना आपली छेड काढण्यात आल्याचा दावा तरुणीने केला आहे. नेहा बिसवाल असं या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचं नाव आहे. तिने व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये संपूर्ण घटनेची माहिती सांगितली आहे. तिने दावा केला की ती BTM लेआऊटच्या रस्त्यावरून चालत होती आणि व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. यावेळी सायकलवरून जाणारा एक मुलगा विरुद्ध दिशेने आला आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बंगळुरू पोलिसांनी व्हिडिओची स्वत:हून दखल घेतली असून या घटनेचा तपास सुरू केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा बिसवाल तिथे भाड्याच्या घऱात राहत असून, या घटनेमुळे मानसिक धक्का बसला असल्याचं सांगितलं आहे. "माझ्यासोबत असं कधीच घडलेलं नाही. मला फार वाईट वाटत आहे. मी चालत असताना व्हिडीओ रेकॉर्ड करत होती. यावेळी हा मुलगा मी जाणाऱ्या दिशेला सायकल चालवत होता. मला पाहिल्यानंतर त्याने यु-टर्न घेतला आणि माझ्या दिशेने येण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने मला चिडवलं, मी बोलते तसं बोलून दाखवलं आणि नंतर विनयभंग केला," असा दावा तिने केला आहे.


यानंतर मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तरुणीने आरडाओरड केल्याने तेथील स्थानिकांनी त्याला पकडलं. यादरम्यान अनेकांनी तरुणीला मुलगा लहान असून त्याने जाणुनबुजून केलं नसावं असं सांगत त्याला सोडून देण्याचा सल्ला दिला. 



"जेव्हा मी लोकांना त्याने काय केलं याचा व्हिडीओ दाखवला तेव्हा त्यांचा माझ्यावर विश्वास बसला," असं तिने सांगितलं आहे. "अनेकजण मला तो लहान आहे त्यामुळे सोडून दे असं सांगत होते. पण थांबले नाही, मी त्याला मारलं. यावेळी अनेक लोक होते ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याला मारहाण केली. पण करं सांगायचं तर मला आता येथे सुरक्षित वाटत नाही आहे," असंही ती म्हणाली.


दुसऱ्या एका व्हिडीओत नेहाने सांगितलं की, तिने औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. परंतु बंगळुरू पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती तिने दिली. "मी एफआयआर दाखल केला नाही, कारण यामध्ये एका लहान मुलाचा समावेस आहे. मला त्याचं भविष्य उद्ध्वस्त करायचं नाही. पण त्याला पकडलं जावं आणि त्याला एक प्रकारचा इशारा दिला जावा असं मला वाटतं," असं ती म्हणाली.


बंगळुरू पोलिसांनी आपल्याला खूप मदत केली असल्याचंही तिने यावेळी सांगितलं. "त्यांनी मला मी स्थानिक नाही असं भासवू दिलं नाही. परंतु जे घडले त्यामुळे मी अजूनही मानसिकरित्या अस्वस्थ आहे," असं तिने सांगितलं.