नवी दिल्ली: सोशल मीडिया हा भाजपचा आत्मा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तो कसा काढणार, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ट्विट करून आपण सोशल मीडियाला रामराम करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी 'झी २४ तास'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की. सोशल मीडिया ही भाजपची फौज आहे. त्यामुळे सेनापती सोशल मीडिया सोडत असेल तर परिणाम होईल, असे राऊत यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४मध्ये याच सोशल मीडियामुळे भाजप सत्तेत आली होती. भाजपसाठी सायबर सेल म्हणजे फौज आहे. आता सेनापतीच सोशल मीडियापासून दूर जात असेल तर ही फौज काय करणार? भाजपने सोशल मीडियात मोठे भांडवल गुंतवले आहे. मात्र, सोशल मीडियाच्या नकारात्मक वापरामुळे काय नुकसान होऊ शकते, हे नरेंद्र मोदींना आत्ता उमगले असावे, असे राऊत यांनी सांगितले. 


अमृता फडणवीस यांचाही सोशल मीडियाला रामराम?


लालबहादूर शास्त्री यांनी एकवेळचे जेवण सोडले त्याप्रमाणेच नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला असेल. सोशल मीडियावर यापूर्वी कधीही इतकी नकारात्मक भाषा वापरली गेली नव्हती. त्यामुळे आता प्रमुख लोकांनी पुढे येऊन नवा आदर्श निर्माण केला पाहिजे. किंबहुना राजकीय नेत्यांनी पुढील पाच वर्षे सोशल मीडिया सोडावा, असा सल्लाही यावेळी राऊत यांनी दिला. 


नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विट करून सोशल मीडियाला कायमचा रामराम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे. लवकरच मी तुम्हाला याबद्दल कळवेन, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते.