मुंबई : लान्स नाईक चंद्रशेखर 38 वर्षांपूर्वी सियाचीनमध्ये बेपत्ता झाले होते. 29 मे 1984 रोजी सियाचीन ग्लेशियरवरून शेवटचा त्यांच्यासोबत संपर्क झाला होता. 'ऑपरेशन मेघदूत' अंतर्गत पाठवलेल्या सर्च टीमचा ते भाग होते. सियाचीनमध्ये गस्त घालत असताना बर्फाच्या वादळाच्या तडाख्यात ते बेपत्ता झाले होते. 12 सैनिकांचे पार्थिव अवशेष सापडले होते पण परंतु लान्स नाईक चंद्रशेखर यांच्यासह उर्वरितांचा शोध लागू शकला नव्हता. कुटुंबाने पुढची 38 वर्षे त्यांची वाट पाहिली. कदाचित देवाने ऐकले असेल. नुकतेच राजस्थान रायफल्सच्या गस्ती दलाला लान्स नाईक चंद्रशेखर यांचे अवशेष सापडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी लान्स नाईक चंद्रशेखर यांचे अवशेष उत्तराखंडमधील हल्दवानी येथील घरी पोहोचले तेव्हा लष्कराचे जवान आपल्या शूर सैनिकाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. लान्स नाईक चंद्रशेखर यांना पूर्ण लष्करी सन्मानाने निरोप देण्यात आला. भारतीय सेना आपल्या शूरवीरांना कधीही विसरत नाही. त्यांच्या बलिदानाचा आदर करते.


लान्स नाईक चंद्रशेखर यांची ओळख आर्मी डिस्कवरूनच झाली. कोणत्याही मोहिमेवर जाताना प्रत्येक भारतीय सैनिकाला ओळखपत्र घालावे लागते. त्यावर सैनिकाचा आर्मी नंबर लिहिलेला असतो. लान्स नाईक चंद्रशेखर यांच्या डिस्कवर 4164584 लिहिले आहे.


लष्कराच्या कागदपत्रांनुसार, अल्मोडा येथील रहिवासी असलेले चंद्रशेखर 1975 मध्ये भरती झाले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बुधवारी हल्द्वानी गाठून लान्स नाईक यांना श्रद्धांजली वाहिली.



लान्स नाईक चंद्रशेखर यांचे कुटुंब हल्द्वानीच्या सरस्वती विहार कॉलनीत राहतं. पत्नी शांती देवी यांनी सांगितले की, 1984 मध्ये त्यांच्या लग्नाला नऊ वर्षे झाली होती. शांती या तेव्हा फक्त 28 वर्षांच्या होत्या. त्यांची मोठी मुलगी चार वर्षांची आणि धाकटी मुलगी दीड वर्षांची होती. पुढची 38 वर्षे हे कुटुंब फक्त ओल्या डोळ्यांनी त्यांची वाट पाहत होते. पतीने देशसेवेला प्राधान्य दिल्याचा अभिमान वाटतो, असे शांतीदेवी म्हणाल्या.


38 वर्षांपूर्वी भारतीय लष्कराने आपल्या पराक्रमामुळे सियाचीन पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून वाचवले होते. 1984 मध्ये पाकिस्तानने सियाचीन ग्लेशियर काबीज करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या इराद्यांबाबत माहिती मिळताच भारतीय लष्कर सक्रिय झाले. 13 एप्रिल 1984 रोजी पाकिस्तानी सैन्याच्या आगमनापूर्वीच भारतीय सैनिक तेथे पोहोचले होते.


13 एप्रिल 1984 रोजी बिलाफोंड ला येथे तिरंगा फडकवण्यात आला. चार दिवसांत म्हणजेच १७ एप्रिलपर्यंत भारतीय सैनिकांनी सर्व महत्त्वाच्या ठिकाणांचा ताबा मिळवला होता. तेव्हापासून तेथे सैन्य तैनात करण्यात आले आहेत. 


'ऑपरेशन मेघदूत'साठी अनेक शूर सैनिकांना सियाचीनला पाठवण्यात आले. 19 कुमाऊँ रेजिमेंटचे लान्स नाईक चंद्रशेखर हे देखील त्यापैकी एक होते.


सियाचीन ग्लेशियर येथे तापमान कधी कधी -50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचते. 18,800+ फूट उंचीवर असलेल्या या 76 किमी लांबीच्या हिमनदीवर दरवर्षी 35 फूट बर्फवृष्टी होते. बर्फाचे वादळे कधी येतील हे कोणालाच माहीत नाही. हलकी वादळे सतत वाहत असतात. अशा प्रतिकुल परिस्थितीतही जवान येथे राहत असतात. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या जवानांना आम्ही देखील सलाम करतो.