मुंबई : सरकारच्या जवळपास सगळ्याच योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. पण आधार कार्डामध्ये चुका असल्यामुळे अनेकांना याचा त्रास होताना दिसत आहे. काहींच्या आधार कार्डवरचं नाव चुकलं आहे तर काहींची जन्म तारीखही चुकली आहे. आधार कार्डवरच्या या चुका आता घरबसल्या दुरुस्त करता येणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधारच्या वेबसाईटवर जाऊन नाव, पत्ता, लिंग, जन्म तारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल अॅड्रेस अपडेट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावं लागेल. या पोर्टलवर गेल्यानंतर तिकडे तुमचा आधार क्रमांक लिहा.


आधार क्रमांक लिहील्यावर तुमच्या रजीस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी मिळेल. हा ओटीपी पोर्टलवर टाकल्यावर तुम्हाला लॉग इन करता येईल.


लॉग ईन केल्यावर अपडेट पोर्टलवर जाऊन डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करा. यानंतर आधार अपडेट फॉर्म उघडेल. या फॉर्ममध्ये चुकीची माहिती बदलून सबमिट बटण दाबल्यावर तुमचं आधार कार्ड अपडेट होईल.


आधार कार्डवरची माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला त्यासाठीची कागदपत्रही द्यावी लागणार आहेत. पण ई मेल आयडी, मोबाईल नंबर आणि लिंग बदलण्यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज पडणार नाही.


तर नाव, जन्म तारीख आणि पत्ता बदलण्यासाठी कागदपत्र देणं बंधनकारक असणार आहे. यासाठी पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशन किंवा पीडीएस फोटो कार्ड, व्होटर आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स ही कागदपत्र चालणार आहेत.