नवी दिल्ली - सामाजिक प्रश्नांबद्दल बघ्याची भूमिका घेणारे देशातील श्रीमंत लोक म्हणजे सडलेल्या बटाट्याप्रमाणे असल्याचे वक्तव्य जम्मू-काश्मीरचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुलीच्या लग्नात ७०० कोटी रुपये खर्च करतील, पण देशापुढील प्रश्न सोडवण्यासाठी सढळ हाताने एक रुपयाची मदत करणार नाहीत, असे खडेबोलही मलिक यांनी श्रीमंतांना सुनावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मूमधील सैनिक कल्याण सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना प्रत्यक्ष नाव न घेता त्यांनी देशातील श्रीमंत वर्गाचे कान टोचले. मलिक म्हणाले, युरोप आणि अन्य पाश्चिमात्य देशात श्रीमंत लोक त्यांच्या उत्पन्नातील मोठी रक्कम दान करतात. मायक्रोसॉफ्टच्या मालकांकडून तर त्यांच्या उत्पन्नातील ९९ टक्के रक्कम दान करण्यासाठी वापरली जाते. ७०० कोटी रुपयांत देशात ७०० शाळा उभारत्या आल्या असत्या आणि तिथे वीरपत्नींच्या सात हजार मुलांना शिक्षण देता आले असते. पण या लोकांकडून दान केले जात नाही. समाजातील या गटातील लोकांकडे संवेदनशीलता दिसत नाही. 


आपल्या मुलीच्या लग्नात कोट्यवधी खर्च करणाऱ्या देशातील एका श्रीमंत उद्योगपतीला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, तुम्ही किती पैसे दान करता. तर ती कोट्यधीश व्यक्ती म्हणाली आम्ही दान करत नाही तर देशाच्या संपत्तीत भर घालतो. मुलीच्या लग्नात कोट्यवधी खर्च करून ते देशाच्या संपत्तीत भरच घालत आहेत का, असा प्रश्नही सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केला. 


आपल्या देशातील समाज हा केवळ श्रीमंतांपासून तयार झालेला नाही. तर त्यामध्ये शेतकरी, कर्मचारी, कामगार, सैनिक या सर्वांचे योगदान आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.