तुझ्या आनंदातच मला... खोली साफ करताना सापडलेल्या `या` Love Letterची जोरदार चर्चा
Viral Letter : व्हॅलेंटाईन वीकमध्ये समोर आलेल्या या लव्ह लेटरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. लोकांनीही दिलखुलासपणे या प्रेमपत्रावर प्रतिक्रिया दिल्या आहेत
Viral Letter : सध्या व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week) सुरु असून सगळीकडे फक्त प्रेमाचीच चर्चा सुरुय. प्रेमी युगुल रोज व्हॅलेंटाईन वीकमधील एक एक डे साजरा करत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक लव्ह लेटर (Love Letter) व्हायरल झालंय. ट्विटरवर (Twitter) व्हायरल झालेल्या लव्ह लेटरची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे हे पत्र कोणी लिहिलं आहे याचीही लोकांमध्ये उत्सुकता आहे. ट्विटरवर हे पत्र शेअर करताना युजरने ते लिहीणाऱ्याची ओळख लपवण्यासाठी त्याचे नाव लपवले आहे. पण ज्याने लिहिलं आहे, त्यांनी अगदी मन लावून प्रेमाने लिहिलं आहे.
ओंकार खांडेकर नावाच्या ट्वीटर युजरने हे पत्र ट्विटरवर पोस्ट केले आहे. ओंकारला हे पत्र त्याची खोली साफ करताना सापडले. त्यानंतर ओंकार यांनी हे पत्र यांनी शेअर केले आहे. ओंकार हे संशोधन आणि मीडिया कंपनी द मॉर्निंग कॉन्टेक्स्टमध्ये एक वरिष्ठ लेखक आहेत. 'आज माझी खोली साफ करताना मला एक प्रेमपत्र सापडले. हे त्या व्यक्तीचे आहे जो माझ्या आधी या ठिकाणी राहत होता,' असे ओंकार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ओंकार खांडेकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना हे पत्र एका ड्रॉवरमध्ये सापडले.
काय म्हटलंय पत्रात?
या पत्रात नावांचा उल्लेख करण्यात आला नसला तरी E कडून M साठी हे पत्र लिहीलं आहे. पत्र लिहीणाऱ्याने ते इंग्रजीत लिहिले आहे. "या क्षणी तुझ्यासोबत राहून मी धन्य झालोय. दु: खी किंवा आनंदी नाही पण आपल्याला मिळालेल्या आनंदासाठी मी फक्त कृतज्ञ आहे. मला तुझ्या आनंदात आणि समाधानात आनंद वाटतो. आपण हे क्षण एकत्र घालवण्याचे ठरवले आहे आणि जे काही घडलं ते तुझ्या सोबतचे गोड क्षण शोधण्यामुळेच घडलं आहे. माझे प्रेम तुझ्याबरोबर प्रवास करत असल्याने मला कसलीही भीती नाही. या प्रवासात तुला जे काही मिळेल ते तुला आश्चर्यचकित करेल आणि आनंद देईल. I love You..." असे या पत्रात म्हटलं आहे.
11 फेब्रुवारी रोजी हे लेटर ट्विटरवर शेअर करण्यात आल्यानंतर लोकांनी त्याच्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. आतापर्यंत 91 हजार लोकांनी हे पत्र पाहिलं आहे. समीर नावाच्या एक युजरने ही चांगली स्क्रिप्ट होऊ शकते असे म्हटले आहे.
"चित्रपटाच्या स्क्रिप्टसाठी हे खूप चांगले आहे. तुम्ही त्यात भारतीय आर्मी विरुद्ध पाक आर्मी असा अॅंगल देखील काढू शकता. त्यामुळे आणखी लोकप्रियता मिळेल. यासाठी दक्षिणेतील अभिनेत्यांना कास्ट केले जाऊ शकते जेणेकरून ते छान आणि वास्तविक दिसेल," असे या युजरने म्हटलं आहे.