`सोनिया आणि राहुल तुरुंगात जाण्यापासून दोनं पावलं दूर`
सोनिया आणि राहुल गांधी 50 हजाराच्या जामीनावर बाहेर
भोपाळ : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीला काही दिवस उरले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. एकीकडे भाजपाला आपली सत्ता कायम ठेवण्याचं आव्हान आहे तर दुसरीकडे कॉंग्रेस पुन्हा सत्तेची चावी शोधतेयं. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संदीप पात्रा यांनी भोपाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसवर निशाणा साधला. 'कॉंग्रेस परिवाराची सत्यता समोर आणण्यासाठी आमच्याकडे खूप पुरावे आहेत. मध्य प्रदेशच्या लोकांना गांधी परिवाराचा खरा चेहरा दिसायला हवा' असे पात्रा म्हणाले.
'माझ्या मागे नॅशनल हेराल्डची इमारत आहे जी भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी 50 हजाराच्या जामीनावर बाहेर असून तुरुंगात जाण्यापासून दोन पावलं दूर असल्याचे'ही ते म्हणाले.
काय आहे हे प्रकरण...
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सन १९३८ मध्ये ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले. ते सन २००८ मध्ये बंद पडले.
त्यानंतर सन २०१० मध्ये ‘यंग इंडिया’ या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीने हे वृत्तपत्र विकत घेतले.
या व्यवहारासाठी काँग्रेसने तब्बल ९० कोटी रुपये कर्जाऊ दिले होते.
काँग्रेसकडून कर्ज घेऊन हे वृत्तपत्र ताब्यात घेण्याचा व्यवहार हा या वृत्तपत्राच्या मालमता ताब्यात घेण्यासाठी करण्यात आला असून तो बेकायदेशीर आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.