सोनिया गांधी आणि शरद पवार भेट, सत्तासंघर्षाची कोंडी आज फुटणार ?
शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज दिल्लीत होत असलेल्या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. महाराष्ट्रातासध्या अस्तित्वात असलेल्यचा सत्तासंघर्षाची कोंडी फुटण्याच्या दृष्टीनं, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातली आजची भेट महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी अनुकूल आहे. तर राज्यात शिवसेनेसोबत जाऊन सत्तास्थापन करण्याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अजून चर्चा सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी भेटीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात
भाजपा आणि अपक्ष मिळून १४ ते १५ आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. संपर्कात असलेल्या या आमदारांना योग्यवेळी पक्षात घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवाय ही भरती मेगाभरती नसून मेरिटवर भरती असणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले. भाजपात गेलेले अनेक नेते राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक आहेत, पण स्थानिक नेत्यांशी बोलूनच भाजपात गेलेल्या नेत्यांना परत घेण्याबाबत विचार करणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेल्या आमदारांची नावं घेऊन त्यांना आता अडचणीत आणणार नाही, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.