`शिवसेनाप्रमुखांना भेटल्याने सोनिया गांधी नाराज`
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या नाराज होत्या, असा गौप्यस्फोट त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.
राष्ट्रपतिपदाचा उमेदवार म्हणून आपण मुंबईत आलो होतो. शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी 'मातोश्री'वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच पुढाकाराने आपण बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती, असे त्यांनी पुस्तकात नमुद केलेय.
ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आपण व्यक्त केली आणि पवार यांनी त्वरित होकर दिला. त्यानुसार ठाकरे यांची भेट घेतली आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या. तेव्हा मराठा टायगरचा बंगाल टायगरला पाठिंबा, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, अशी आठवणही मुखर्जी यांनी पुस्तकात उल्लेख केलाय.
मुंबईचा दौरा आटोपून दिल्लीला परतलो, तेव्हा ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांनी आपल्याशी चर्चा केली. ठाकरे यांची भेट घेतल्याने सोनिया गांधी आणि त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे नाराज असल्याचे व्यास यांनी आपल्याला सांगितले. मात्र त्यानंतर आपण त्यांची समजूत काढली, असे मुखर्जी यांनी 'द कोअलिशन इयर्स' या पुस्तकात म्हटलेय.