नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून  मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहलेले पत्र नुकतेच समोर आले होते. या पत्रात त्यांनी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत भविष्यात पक्षाला अधिक सक्रिय नेतृत्त्वाची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, साधारण १५ दिवसांपूर्वी हे पत्र सोनिया गांधी यांना पाठवण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. तसेच आगामी काळात पक्षाची वाटचाल कशी असावी, यासाठी पर्यायही सुचवण्यात आले होते. पक्षाला प्रभावी आणि पूर्णवेळ नेतृत्त्व मिळावे, असेही सांगण्यात आले आहे. हे नेतृत्त्व लोकांच्या नजरेत राहणारे आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे असावे. भविष्यात पक्षाने एकसंधपणे वाटचाल करण्यासाठी संस्थात्मक नेतृत्त्व अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांनीही अध्यक्षपद स्वीकारायला नकार दिल्यास काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती विराजमान होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.