नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी आज तातडीने काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीला के. सी. वेणूगोपाल, अधीररंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, ए. के. अँटनी आणि अन्य काँग्रेस नेते उपस्थित होते. लोकसभेतल्या रणनीतीबाबत आणि राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत सोनियांनी नेत्यांशी चर्चा केल्याचं समजतं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीत झालेल्या कालच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीमुळे महाशिवआघाडीनं सत्तास्थापनेच्यादृष्टीनं काही पावलं टाकली. मात्र अजूनही बैठकांचं सत्र सुरूच आहे. आजच्या पुन्हा दिल्लीत बैठका असून उद्या शिवसेनेसोबत आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक आहे. चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच असल्यामुळे सत्तास्थापनेला कधी मुहूर्त मिळणार हा खरा प्रश्न आहे. शिवसेनेसोबत जाण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मन कुणी वळवलं याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. 


दुसरीकडे शिवसेनेनं एनडीएतून बाहेर पडण्याची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसताना भाजपनं तडकाफडकी शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढलंय. भाजपमध्ये एवढं बळ नेमकं कुठून आलं? पडद्यामागे भाजपमध्ये काय हालचाली सुरू आहेत? याबाबत उत्सुकता ताणली गेली आहे.