नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाकडून शनिवारी संसदीय दलाच्या नेतेपदी सलग चौथ्यांदा सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड होणार असल्याची चर्चा होती. मात्र, सोनिया गांधी यांची या पदावर निवड करून चर्चेला पूर्णविराम देण्यात आला.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते आणि खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनियांनी म्हटले की, देशातील १२.१३ कोटी मतदारांनी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. आजच्या बैठकीत लोकसभेतील पक्षाच्या रणनितीवरही चर्चा करण्यात आली.



 दरम्यान, यानंतर लवकरच सोनिया गांधी काँग्रेसच्या लोकसभा आणि राज्यसभेतील नेत्याची निवड करतील. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. काँग्रेसला केवळ ५२ जागांवर विजय मिळविण्यात यश आले आहे. त्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीत देखील २०१४ प्रमाणे विरोधी पक्षनेत्याचे पद मिळणार नाही. त्यातच आता लोकसभेचा नेता निवडण्यासाठी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. 
 
 काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र, राष्ट्रीय कार्यकारिणीने राहुल यांचा राजीनामा फेटाळून लावला होता. 


गेल्या दोन दिवसांमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्या आहेत. यानंतर शरद पवार राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचारात असल्याची चर्चा आहे. जेणेकरून एकत्रित संख्याबळाच्या आधारे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या पदरात पडेल. तसेच या पदासाठी शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केल्याचीही चर्चा दिल्लीमध्ये रंगली आहे.