नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी महिला आरक्षण विधेयकासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. सरकारनं आगामी अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक आणावं असं त्यांनी या पत्रात नमूद केलंय. या विधेयकाला काँग्रेस पूर्णपणे पाठिंबा देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी या पत्रात दिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनियांनी मोठ्या खुबीनं दुर्गापूजेच्या मुहूर्त साधत महिला आरक्षणाची मागणी केलीय. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात काँग्रेसनं महिला आरक्षणाचं विधेयक आणण्याचा प्रयत्न केला. मात्र समाजवादी पार्टीसारख्या पक्षांनी त्याला तीव्र विरोध केला होता. त्यामुळं हे विधेयक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. 


मात्र आता काँग्रेसनं विरोधात असताना पुन्हा या विधेयकाचा मुद्दा पुढं आणलाय आणि भाजपच्या कोर्टात चेंडू टोलवलाय. त्यामुळं पंतप्रधान मोदी या पत्राला काय प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.