नवी दिल्ली : CoronaVirus कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात अतिशय महत्त्वपूर्ण लढाई लढली जात असतानाच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. शिवाय येत्या काळात कोरोनाशी लढत असताना राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांचा कालावधी हा आणखी तीन महिन्यांसाठी वाढवावा अशी विनंतीही त्यांनी या पत्रातून केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नधान्यांच्या या सुविधा समाजातील शिधापत्रिका नसणाऱ्या वर्गापर्यंतही पोहोचवाव्यात असा आग्रही सूर त्यांनी या पत्रातून आळवला. सध्याच्या घडीला आपला देश एका आव्हानात्मक काळातून जात आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम हा हातावर पोट असणाऱ्या वर्गावर होत आहे. या संकटसमयी भारत सरकारकडून पुरवण्यात येणारा अन्नधान्यसाठा खुला करावा म्हणजे कोणाचीही उपासमार होणार नाही असा सल्ला त्यांनी दिला. 


अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत मोदी सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं. आगामी काळात अर्थव्यवस्था आणि देशाच्या धान्यकोठारांवर येणारा  ताण लक्षात घेता त्यांनी अन्नधान्यांच्या किंमती वाढण्याची बाबही अधोरेखित केली. या परिस्थितीचा आढावा घेत गरजूंचा दोन वेळचं अन्न मिळण्यासाठी प्रशासनाने शक्य ते उपाय योजावेत अशी विनंती केली. 



 


कोरोना व्हायरसशी संपूर्ण जग आणि भारत देशही लढा देत असतानाच या वातावरणात राजकारण बाजूला सारत सर्वच पक्षांनी एकत्र येत या वैश्विक महामारीवर मात करण्यायसाठी एकजुटीने परिस्थितीला सामोरं जाण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यानच पंतप्रधान मोदींना विविध पक्षांकडून काही महत्त्वाचे सल्लेही देण्यात येत आहेत.