कुठे आणि का गायब झाला होता सोनिया गांधींच्या ताफ्यातील एसपीजी कॉन्स्टेबल?
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून एक एसपीजी कॉन्स्टेबल अचानक गायब झाला आणि अनेकांना धक्का बसला.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सुरक्षा ताफ्यामधून एक एसपीजी कॉन्स्टेबल अचानक गायब झाला आणि अनेकांना धक्का बसला.
यानंतर बुधवारी रात्री तो सापडल्याच्या बातम्याही आल्या. पोलिसांना अतिशय दयनीय अवस्थेत हा एसपीजी कॉन्स्टेबल सापडला होता. कुठे गायब झाला होता हा कॉन्स्टेबल? काय घडलं होतं त्याच्यासोबत? काय कारण होतं त्याच्या गायब होण्यामागे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्याच्या गायब होण्यामागे राजकीय कारण आहे का? अशीही शंका काहींनी उपस्थित केली होती. परंतु, आपल्या खाजगी कारणांमुळे हा एसपीजी कॉन्स्टेबल गायब झाला होता, असं आता समोर येतंय.
कुठे झाला होता गायब?
३१ वर्षांच्या या कॉन्स्टेबलचं नाव राकेश कुमार वर्मा असं आहे. दिल्लीच्या लुटियन्समध्ये तो पोलिसांना अत्यंत वाईट स्थितीत सापडला. १ सप्टेंबरपासून राकेश कुमार गायब होता. तीन सप्टेंबर रोजी त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत त्याचा ठावठिकाणा लागत नसल्याची तक्रार नोंदवली होती. यामुळे सुरक्षा एजन्सीजचेही धाबे दणाणले होते.
म्हणून सोडलं घर...
राकेशनं आपल्या आर्थिक परिस्थितीला कंटाळून घर सोडल्याचं समजतंय. त्यानं जवळपास चार लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ऑगस्ट महिन्यात त्यानं ४० हजार रुपये चुकवले होते. पण यामुळे आर्थिक तंगी वाढली होती. यानंतर त्याला आपल्या घरीही जावसं वाटत नव्हतं. त्यामुळे तो दिल्लीच्या रस्त्यांवर फिरत राहिला.
बुधवारी राकेशला टिळक मार्गावर एका व्यक्तीनं दयनीय अवस्थेत पाहिलं. राकेश लोकांकडून खायला-प्यायला मागत होता. त्या व्यक्तीला राकेशकडे एसपीजीचं ओळखपत्र दिसल्यानंतर त्यानं एसपीजीच्या कंट्रोल रुमला फोन लावला. पोलिसांनाही याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी राकेशला ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती कळवली.