सोनिया गांधींच्या बंगल्यातून SPG कमांडो बेपत्ता
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानातून एक एसपीजी कमांडो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थानातून एक एसपीजी कमांडो बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोनिया गांधी यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या १० जनपथमध्ये सुरक्षेसाठी एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) तैनात आहेत. मात्र, यापैकी एक एसपीजी कमांडो १ सप्टेंबरपासून बेपत्ता आहे. सुरक्षेसाठी तैनात असलेला एसपीजी कमांडोच बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बेपत्ता झालेल्या एसपीजी कमांडोचं नाव राकेश कुमार असं आहे. तो सोनिया गांधींच्या १० जनपथमध्ये सुरक्षेसाठी तैनात होता. राकेश कुमार द्वारका येथील सेक्टर ८ मध्ये भाड्याच्या घरात राहतो.
चौकशीत समोर आलं आहे की, राकेश कुमार एक सप्टेंबर रोजी आपल्या घरातून एसपीजी कमांडोंचे कपडे परिधान करुन ड्यूटीसाठी निघाला होता. १० जनपथवर राकेश पोहोचला आणि त्यानंतर त्याच्या इतर सहका-यांना भेटला. त्यानंतर काही वेळाने तो तेथून निघून गेला.
या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी सांगितले की, २ सप्टेंबर रोजी राकेश घरी पोहचला नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की त्याची डबल शिफ्ट लागली असेल किंवा इतर मित्राकडे गेला असेल. यानंतर राकेशच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.
पण, राकेश ३ सप्टेंबरपर्यंत घरी पोहोचला नसल्याने नातेवाईकांना काळजी वाटण्यास सुरुवात झाली. यानंतर त्यांनी १० जनपथमध्ये दाखल होत चौकशी केली त्यावेळी सर्व घटना समोर आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चौकशीत अशी माहिती समोर आली आहे की, राकेश ज्या दिवशी घरातून बाहेर पडला होता त्या दिवशी त्याची सुट्टी होती. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, सुट्टीच्या दिवशी राकेशने एसपीजी कमांडोजचे कपडे घालून घरातून बाहेर का पडला.