नवी दिल्ली : देशभरात अनेक ठिकाणी दारूबंदी कठोरपणे अंमलात आणली जात आहे. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन दारू कंपन्यांनी अजब शक्कल लढवली आहे. यात विजय माल्ल्याची किंगफिशर आघाडीवर असून, या कंपन्या अल्कोहोल विरहीत बिअरचे उत्पादन करणार आहेत. ही बिअर मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यसम्राट विजय माल्ल्या याची युनायटेड ब्रेवरीज किंगफिशर ही कंपनी भारतातील बिअर निर्मिती करणारा सर्वात मोठा ब्रांड म्हणून ओळखली जाते. ही कंपनीच अशा प्रकारची बिअर बनवणार आहे. विशेष असे की, संपूर्ण दारूबंदी असलेल्या बिहारमध्येच कंपनी बिअर निर्मितीचा प्लांट उभारणार आहे. ज्या राज्यांत दारूबंदी आहे तिच राज्ये कंपनीच्या रडारवर असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात दारूबंदी असलेल्या राज्यांमध्ये अल्कोहोल विरहीत बिअर मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.


दरम्यान, जानेवारी महिन्यापर्यंत बिअरचे उत्पादन सुरू होईल. तसेच, येत्या उन्हाळ्यापर्यंत सर्व राज्यांत ही बिअर पोहोचवली जाईल अशी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव कंपन्यांच्या विचाराधीन आहे. प्रामुख्याने बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, तामिळनाडू आणि केरळमध्ये पहिल्या टप्प्यात ही बिअर पोहोचवायचा कंपन्यांचा विचार आहे. महत्त्वाचे असे की, या सर्व राज्यांमध्ये संपूर्ण दारूबंदी आहे.