Vande Bharat Express: वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सेवेत आल्यापासून तिच्यावर दगडफेक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी भारतीय रेल्वेकडून सतत प्रयत्न होत आहे. त्यातच आता दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway) लोकांना वंदे भारत एक्स्प्रेवर दगडफेकीसारख्या समाजविरोधी घटनांमध्ये सहभागी होऊ नका असं आवाहन केलं आहे. अन्यथा दोषींना पाच वर्षांच्या जेलची शिक्षा भोगावी लागेल असा इशारा रेल्वेने दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेलंगणात वेगवेगळ्या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्यानंतर हा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने प्रेस रिलीजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, Kazipet, Khammam, Kazipet-Bhongir आणि Eluru-Rajahmundry या ठिकाणी सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या 9 घटना घडल्या आहेत. 


'वंदे भारत'वर दगडफेक केल्यास पाच वर्षांची जेल


फेब्रुवारी 2019 मध्ये वंदे भारत सेवेत आल्यापासून तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये तिला टार्गेट करण्यात आलं आहे. 


ट्रेनवर दगडफेक करणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. ही शिक्षा 5 वर्षांपर्यंत असू शकते, असं दक्षिण मध्य रेल्वेने प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (Railway Protection Force) याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल केले असून, 39 जणांना अटक केली आहे. 


स्थानकांवरील सुरक्षेत वाढ


दगडफेकीच्या घटना कमी करण्याच्या हेतूने रेल्वे सुरक्षा दल प्रयत्न करत असून यासाठी काही मोहीमा आखण्यात आल्या आहेत. तसंच रेल्वे ट्रॅकजवळील सरपंचांशी संवाद साधत असून त्यांना मित्र केलं जात आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेन्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली आहे. तसंच दगडफेक होणाऱ्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 


वंदे भारत एक्स्प्रेसच्या आधी अशाच प्रकारे राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. 11 मार्चला हावडा - न्यू जलपैगुडी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत एका डब्याची काच फुटून नुकसान झालं होतं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वरिष्ठ सल्लागार कांचन गुप्ता यांनी यावर नाराजी जाहीर करत ट्विट केलं होतं. "वंदे भारत गाड्यांवर दगडफेक करणं लाजिरवाणी बाब असून हे राजकीय निर्देशांशिवाय शक्य नाही. तुम्ही देशासाठी काहीही चांगलं करू शकत नाही; आणि इतर कोणालाही काहीही करू देणार नाही हा असा प्रकार आहे," असं त्यांनी म्हटलं होतं.