नवी दिल्ली : अनेकवेळा न जाणता केलेलं वक्तव्य बऱ्याच गोष्टी सांगून जातं. भारताच्या दौऱ्यावर आलेले दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे-इन यांनी असंच एक वक्तव्य केलेलं आहे. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरिया दौऱ्याचा आतुरतेनं वाट पाहत आहे. तोपर्यंत आम्ही वेगवेगळ्या बहुपक्षीय संमेलनामध्ये बातचित करतच राहु, असं वक्तव्य मून जे-इन यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ मे २०१९ पर्यंतच आहे. त्यामुळे २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा विजय झाला तरच ते २०२० साली दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जातील. असं असलं तरी मून जे-इन यांनी मोदी पुन्हा पंतप्रधान बनतील, अशीच भविष्यवाणी केली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहयोग, समृद्धी आणि शांततेसाठी आम्ही भारताशी सहमत असल्याचं मून जे-इन म्हणाले. दोन्ही देश प्रत्येक वर्षी समिट स्तरावर चर्चा करतील, अशी घोषणाही मून जे-इन यांनी केली. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मून जे-इन यांचं तोंड भरून कौतुक केलं. कोरिया भागामध्ये शांततेचा प्रयत्न करण्याचं सगळं श्रेय राष्ट्रपती मून यांना जातं.


दक्षिण कोरियामधली सकारात्मकता राष्ट्रपती मून यांच्या प्रयत्नांमुळे असल्याची प्रतिक्रिया मोदींनी दिली. मोदींनी उत्तर कोरियाचं नाव न घेता दोन्ही देशांच्या शांती वार्तेचा संदर्भ दिला. दक्षिण कोरियानं असंभवला संभव करून दाखवलं. कोरियाच्या कंपन्यांनी फक्त भारतात गुंतवणूकच केलेली नाही तर त्यांची उत्पादनं भारतातल्या घरा-घरात लोकप्रिय असल्याचं मोदी म्हणाले.