रामपूर: उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने लढवलेली शक्कल सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे. सपाचे नेते अखिलेश यादव यांनी खासदार आझम खान यांच्या समर्थनासाठी रामपूरमध्ये आंदोलनाची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर योगी सरकारने सपाच्या कार्यकर्त्यांना रामपूरमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे सपाच्या कार्यकर्त्यांना रामपूरमध्ये पोहोचणे मोठे अवघड झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा परिस्थितीत संभलचे सपाचे जिल्हाध्यक्ष फिरोज खान यांनी हटके शक्कल लढवत पोलिसांना गुंगारा दिला आणि रामपूर गाठले. रस्त्यावर पोलिसांकडून नाकाबंदी करून तपासणी सुरु असल्यामुळे फिरोज खान यांनी नवरदेवाचा वेष धारण केला. तोंडावर फुलांच्या मुंडावळ्या घातल्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हता. तर फिरोज खान यांचे कार्यकर्ते गाडीत वऱ्हाडाच्या वेषात बसले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. यानंतर फिरोज खान आपल्या कार्यकर्त्यांसह रामपूरमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले.