`मला वाटलं आता आम्ही जगणार नाही,` भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; शेअर केली पोस्ट, पण पोलिसांनी...
झारखंडमध्ये एका स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. सात जणांनी मिळून महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता.
स्पेनमधील एका जोडप्याने 5 वर्षांपूर्वी दुचाकीवरुन जगभ्रमंती करण्याची योजना आखली होती. यादरम्यान ते 63 देश आणि 17 हजार किमीचा प्रवास करणार होते. पण भारतातील झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 28 वर्षीय स्पॅनिश महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या जोडीदारासह तंबूत वास्तव्य करत असताना आरोपींनी हल्ला करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.
पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. पण त्याआधीच त्यांना अनपेक्षित आणि धक्कादायक अनुभव मिळाला. "कोणालाही येऊ नये अशी धक्कादायक गोष्ट आमच्यासह झाली आहे. सात जणांनी मिळून माझ्यावर बलात्कार केला आहे," अशी माहिती पीडित महिलेने सोशल मीडियावर दिली. तिने आपल्या पोस्टमध्ये काही फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा दिसत होत्या.
पण नंतर पीडित महिला आणि तिच्या जोडीदाराने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट व्हिडीओसह डिलीट केली. झारखंड पोलिसांनी तपासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी ती डिलीट करण्यास सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. "पोलिसांनी मला तपासात अडथळा निर्माण करु नका सांगत, पोस्ट डिलीट करण्यास सांगितली. मी तो व्हिडीओ नंतर पोस्ट करेन," असं महिलेने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत सांगितलं आहे.
महिलेने शेअर केलेल्या व्हिडीओत तिचा चेहरा हल्ल्यामुळे सुजलेला दिसत होता. "माझा चेहरा असा दिसत आहे. पण मला जास्त वेदना यामुळे होत नाही आहेत. मला वाटलं होतं, आम्ही जगणार नाही. सुदैवाने आम्ही जिवंत आहोत," असं तिने लिहिलं होतं.
दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत जलद तपास करण्याच्या हेतूने विशेष तपास समिती गठीत करण्यात आली आहे.
दुमका पोलिस अधीक्षक (एसपी), पितांबर सिंह खेरवार यांनी शनिवारी सांगितलं की, स्थानिक पोलिसांच्या गस्ती पथकाला शुक्रवारी रात्री उशिरा हे जोडपं सापडलं. ते स्पॅनिशमध्ये संवाद साधत आपली शोकांतिका मांडण्यासाठी संघर्ष करत होते. पोलिसांनी तातडीने त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथे भीषण वास्तव समोर आलं.
28 वर्षीय पीडित महिला आणि तिचा 64 वर्षीय पती सध्या दुमका येथील फुलो झानो मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दोघेही धोक्याबाहेर असले तरी, डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.
"दोघेही धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. पीडितेची तीन स्त्रीरोगतज्ज्ञ, एक रेडिओलॉजिस्ट, एक ऑर्थोपेडिक आणि एक दंतचिकित्सक, अधीक्षकांच्या अध्यक्षतेखालील वैद्यकीय मंडळाकडून वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे," अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) दुमका येथे भेट असून सर्व आरोपींना तातडीने पकडण्यात पोलिसांच्या कथित अक्षमतेवर टीका केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी पीडितेला मदतीचे आश्वासन दिलं आहे.