वैष्णोदेवी मंदिराकडून क्वारंटाईन असलेल्या मुस्लिमांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन
मुस्लिमांसाठी मंदिर प्रशासनातर्फे खास इफ्तारी...
नवी दिल्ली : इस्माल धर्मातील सर्वात पवित्र मानला जाणारा रमजानचा महिना सुरु आहे. रमजानच्या महिन्यात अनेक इफ्तार पार्टी केल्या जातात. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे सर्वच जण आपापल्या घरात आहेत. देशात अनेकांना कोरोनाची लागण झाली असून कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढतो आहे. कोरोनाची लागण झालेल्या अनेक रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. वैष्णोदेवी मंदिराच्या आशिर्वाद भवनचंही क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. आशिर्वाद भवनच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांसाठी मंदिर प्रशासनातर्फे खास व्यवस्था करण्यात आली आहे.
श्राइन बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिर प्रशासनाकडून रमजानच्या पवित्र महिन्यात क्वारंटाईन असलेल्या मुस्लिमांसाठी पारंपारिक सहरी आणि इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता जम्मू-काश्मीर प्रशासनने दुसऱ्या राज्यात अडकलेल्या आपल्या लोकांना परत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनदरम्यान सामुहिकरित्या कोणताही सण साजरा करण्यास बंदी आहे. मुस्लीम बांधव रोजा, नमाज आणि दुवा यासह रमजानचा पवित्र महिना साजरा करतात. या महिन्याच्या अखेरीस ईद साजरी केली जाते. परंतु यंदा कोरोनाचं हे संकट संपेपर्यंत दरवर्षीप्रमाणे कोणताही सण एकत्रितपणे, सामुहिकरित्या साजरा करता येणार नसल्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत.