मुंबई: आर्थिक डबघाईमुळे बंद पडलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जेटची प्रतिस्पर्धी असलेल्या स्पाईस जेटने ५०० कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घेतले आहे. यामध्ये जेटचे १०० वैमानिक, २०० केबिन क्रू कर्मचारी आणि २०० तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तुर्तास तरी या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात आम्ही जेटच्या आणखी काही कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेऊ, असे आश्वासनही स्पाईस जेटने दिले आहे. तसेच जेटच्या ताफ्यातील काही विमानेही स्पाईस जेटकडून विकत घेतली जाऊ शकतात. जेट एअरवेजची उड्डाणे रद्द झाल्यामुळे सध्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम असल्याने त्याची तीव्रता आणखीनच वाढली आहे. मात्र, आम्ही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत असल्याचे स्पाईस जेटकडून सांगण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पाईस जेटने गुरुवारी मुंबई-दिल्ली मार्गावर २४ नव्या उड्डाणांची घोषणा केली. २६ एप्रिल ते २ मे या कालावधीत ही सेवा सुरु होईल. याशिवाय, स्पाईस जेटने २७ नवीन विमाने सेवेत दाखल करण्याची घोषणाही केली आहे. यामध्ये २२ बोईंग ७३७एस आणि पाच टर्बोप्रॉप बंबार्डिअर Q400 या विमानांचा समावेश आहे. जेणेकरून जेटची सेवा बंद पडल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची कमी झालेली संख्या भरून काढता येईल.




१७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जेट एअरवेजने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.जेट एअरवेजचा कारभार सुरु ठेवण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. त्यासाठी जेट नव्या गुंतवणूकदारांकडे आस लावून बसली होती. मात्र, कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य न दिल्यामुळे अखेर जेटची सेवा ठप्प झाली. यामुळे जेटचे तब्बल २० हजार कर्मचारी रस्त्यावर आले होते. यामध्ये १६ हजार ऑन पे रोल आणि सहा हजार कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.