चिंताजनक... २४ तासांत करोनाचे ३४,८८४ नवे रुग्ण
कोरोना व्हायरचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा फैलाव देशात मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी अनेक स्तरांमधून विविध उपाय राबवले जात आहेत. तरी देखील कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याचं चित्र संपूर्ण जगासमोर आहे. गेल्या काही महिन्यांपासून फैलत असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कटली आहे. सर्वच देश या महामारीमुळे आलेल्या संकटांना तोंड देत आहेत.
भारतात गेल्या २४ तासांमध्ये ३४ हजार ८८४ नव्या रुणांची नोंद झाली असून ६७१ रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशात एकूण १० लाख ३८ हजार ७१६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २६ हजार २७३ रुग्णांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे, गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल पाच लाख रुग्णांची वाढ झाली आहे.
अशा कठीण प्रसंगी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात ज्या वेगात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्याहूनही अधिक वेगात रुग्ण कोरोनावर मात करत आहेत. सध्या देशात ३ लाख ५८ हजार ६९२ रुग्णांवर उपचार सुरू असून ६ लाख ५३ हजार ७५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.