नवी दिल्ली - संपूर्ण देशभर गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील एका खटल्यात प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी याची सोमवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने निर्दोष सुटका केली. गेल्यावर्षीच तेलगीचा बंगळुरूच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यानंतरही या प्रकरणी सुनावणी सुरू होती. अखेर न्यायालयाने सोमवारी निकाल दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यामध्ये तेलगीला नोव्हेंबर २००१ मध्ये अजमेरमधून अटक करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीचा निकाल देताना १७ जानेवारी २००६ रोजी न्यायालयाने त्याला व साथीदारांना ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. तेलगीला शिक्षा भोगण्यासाठी बंगळुरूमधील कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने तेलगीला तब्बल २०१ कोटी रुपयांचा दंडही ठोठावला होता. तेलगीला कारागृहात विशेष वागणून दिली जात असल्याचा कारागृह विभागाच्या अहवाल पोलिस महासंचालक डी. रुपा यांनी दिल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली होती. कारागृहातील तीन ते चार कैदी तेलगीपर्यंत सर्व माहिती आणि महत्त्वाचे संदेश पोहोचवत असल्याचे त्यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. 


वेगवेगळ्या लोकांचे फोन टॅप केल्यानंतर कोट्यवधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा उलगडा झाला होता. तेलगी आणि त्याचे साथीदार वेगवेगळ्या संस्था, बॅंका, विमा कंपन्या यांना बनावट स्टॅम्प विकत होता.