मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमधील महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'. सरदार वल्लभभाई पटेल 'आयर्न मॅन ऑफ इंडिया' यांचा जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' नावाने ओळखला जातो. २०१८ मध्ये उभारण्यात आलेल्या या पुतळ्याला तब्बल २९८९कोटींचा खर्च झाला होता. या खर्चामुळे मोदी सरकारवर जोरदार टीका झाली होती. हा पुतळा पुन्हा एकदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सगळीकडे कोरोनाच्या धास्तीच वातावरण आहे. देशच काय तर संपूर्ण जग कोरोनाविरूद्ध लढा देत आहे. भारतात कोरोना निधीकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मागणी करत आहे. अशावेळी गुजरातच्या एका महाभाग व्यक्तीने यामध्ये नामी शक्कल लढवली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी करता त्याने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च OLX वर विकण्यास काढलं आहे. 



३०,००० कोटींची बोली लावत हा महत्वकांक्षी प्रकल्प विक्रीसाठी काढला आहे. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 'सध्या देशात रूग्णालय आणि हेल्थकेअर इक्विपमेंट्ससाठी पैशांची गरज असल्याने 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' विकण्याची वेळ आली आहे.' अशी जाहिरात देण्यात आली होती. ओएलएक्सने मात्र ही जाहिरात तात्काळ हटवली आहे. असं असलं तरीही सोशल मीडियावर सध्या याची जोरदार चर्चा आहे.