उत्तरप्रदेशमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक
दगडफेकीत खिडक्यांचे नुकसान
नवी दिल्ली : नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक झाली आहे. वाराणसीहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या एका एक्स्प्रेसवर दगडफेक होत होती. त्याचदरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावरून जात असताना दगडफेकीचा फटका वंदे भारत एक्स्प्रेसलाही बसला आहे. या दगडफेकीत ड्रायव्हरच्या खिडकीसहित इतर खिडक्यांचेही नुकसान झाले आहे.
उत्तर रेल्वेच्या प्रमुख जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या अछल्दा येथे बाजूने जाणाऱ्या डिब्रूगढ राजधानीखाली येऊन एका जनावराचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी डिब्रूगढ राजधानीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली. ज्यात वंदे भारत एक्स्प्रेसलाही दगडफेकीचा फटका सहन करावा लागला. या दगडफेकीत वंदे भारत एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरच्या खिडकीच्या काचांवर तसेच एक्स्प्रेसच्या बाहेरील बाजूच्या काचांवरही दगडांचे तुकडे लागल्याने यात वंदे भारत एक्स्प्रेसचे नुकसान झाले आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रेनच्या नुकसानीचा अंदाज लावण्यात आला. या अंदाजानुसार ट्रेन पुढील प्रवास करण्यास योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.
'वंदे भारत एक्सप्रेस'ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ फेब्रुवारी रोजी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर १७ फेब्रुवारीपासून वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. वंदे भारत ही देशातील सर्वात पहिली इंजिनशिवाय चालणारी सर्वात गतिशील रेल्वे आहे. या संपूर्ण ट्रेनची बांधणी भारतातच करण्यात आली आहे. दिल्ली आणि वाराणसी या मार्गावर ही एक्स्प्रेस धावते.