राजकीय पोस्टर्सवर भारतीय जवानांची छायाचित्रे वापरण्यास निवडणूक आयोगाकडून मनाई
लोकशाहीमध्ये त्यांची भूमिका अराजकीय आणि तटस्थ आहे.
नवी दिल्ली: राजकीय पक्ष आणि नेत्यांनी प्रचारासाठीच्या पोस्टर्सवर भारतीय सैन्यातील जवानांची छायाचित्रे वापरू नयेत, असे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्लीत लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह भारतीय हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र झळकले होते. त्याखाली मोदी है 'तो मुमकिन है... नमो अगेन २०१९' असा संदेशही लिहला होता. मात्र, लष्करातील जवानांचा अशाप्रकारे राजकीय फायद्यासाठी वापर केल्याबद्दल काहीजणांकडून आक्षेप नोंदवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांनी लष्कराचा वापर राजकीय फायद्यासाठी न करण्याच्या सूचना दिल्या.
२७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या एफ-१६ विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या विमानाला पिटाळून लावताना भारतीय वायूदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग-२१ बायसन विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन कोसळले होते. त्याठिकाणी पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन वर्धमान यांना ताब्यात घेतले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला त्यांची सुटका करावी लागली होती. यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या मोठ्या जल्लोषात भारतामध्ये स्वागत झाले. देशभरात अनेक ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाची पोस्टर्सही झळकली होती.
लवकरच कॉकपिटमध्ये परतायचंय, अभिनंदन यांचा उत्साह कायम
मात्र, याचा राजकीय वापर होत असल्याचे ध्यानात आल्यामुळे निवडणूक आयोगाने शनिवारी यासंदर्भात आदेश जारी केला. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय लष्कर हे देशाची सीमा, सुरक्षा आणि राजकीय व्यवस्थेचे रक्षण करते. लोकशाहीमध्ये त्यांची भूमिका अराजकीय आणि तटस्थ आहे. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी प्रचारादरम्यान लष्कराशी संबंधित कोणतेही भाष्य करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे निवडणूक आयोगाने सांगितले.