भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या
Street Dog Attacked: कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही.
Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या कुत्रे आपल्यावर का हल्ला करतात? भटके कुत्रे चावल्यास जबाबदार कोण? याबाबत काही कायदा आहे का? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया.
सर्वप्रथम आपण भटक्या कुत्र्यांपासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची? याबद्दल जाणून घेऊया. कुत्रा भुंकायला लागला किंवा आपल्यामागून पळायला लागला की अनेकजण जोरात पळू लागतात. हीच पहिली आणि मोठी चूक असते. जेव्हा कुत्रा भुंकतो तेव्हा कधीही पळून जाऊ नये, हळू चालत जा. ज्या ठिकाणी जास्त भटके कुत्रे असतात अशा ठिकाणाहूनरात्री किंवा सकाळी फिरायला जाताना एक काठी सोबत ठेवा. या काठीचा कुत्र्यांना धाक बसेल. किंवा तुम्ही त्यांना न मारता हुसकावून लावून स्वत:चे संरक्षण करु शकता. रस्त्यावर बाहेर कुत्री असतील अशा ठिकाणी आपल्या लहान मुलांना एकटे सोडू नका. पिसाळलेले कुत्रे लहान मुलांना टार्गेट करण्याची भीती जास्त असते. दुचाकी चालवताना कुत्रे भुंकत असतील तर वेगाने चालवू नका, पण हळू चालवा., असे उपाय करुन तुम्ही कुत्रा चावण्यापासून स्वत:चे संरक्षण करु शकता.
कुत्रा चावण्याची कारणे समजली तर आपण त्याच्यापासून अंतर ठेवू शकतो.अनेकदा जेव्हा कुत्रा भुकेलेला असतो तेव्हा तो चावू शकतो. स्वतःचे किंवा आपल्या पिल्लांचे संरक्षण करताना कुत्रा चावतो. कुत्र्यांना जाणाऱ्या व्यक्तीचा गैरसमज होणे किंवा धोका वाटणे, भटका कुत्रा वेडा झाला असेल किंवा दुखावला असेल तर किंवा त्याला कोणी भडकावल्यावर तो चावा घेऊ शकतो.
भटका कुत्रा चावल्यास जबाबदार कोण?
कायदेशीरदृष्ट्या बघितले तर रस्त्यावरून कुत्रे हटवणे बेकायदेशीर आहे. तसेच, तुम्ही कुत्र्यांना रस्त्यावरून पळवू शकत नाही. कारण जेव्हा एखादा कुत्रा रस्त्यावर असतो तेव्हा त्याला कोणी दत्तक घेईपर्यंत तेथे राहण्याचा अधिकार कायद्याने मिळतो.
भारतात 2001 पासून भटक्या कुत्र्यांना मारण्यावर बंदी आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला 'उपद्रव' कुत्र्यांना ठार मारण्याची परवानगी दिली होती, मात्र त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती.
जर कोणी भटक्या कुत्र्यांना खायला घातलं तर ते कायदेशीररित्या चुकीचं नाही. त्याचबरोबर भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण, हे स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र असे असले करी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महापालिका, प्राणी कल्याण संस्था आणि समाजाचा दृष्टिकोन उदासीन आणि दुर्लक्षित असल्याचे दिसून येते.