MAdhya Pradesh News in Marathi: मध्य प्रदेशमधील ग्वालियरमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. ग्वालियरमध्ये 24 तासांमध्ये कुत्र्यांनी 548 जणांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांची दाहकता इतकी आहे की यंदाच्या वर्षी म्हणजेच जानेवारी महिना सुरु झाल्यापासून पहिल्या 23 दिवसांमध्ये भटक्या कुत्र्यांनी जिल्ह्यात 10 हजार लोकांना चावा घेतला आहे. सर्व सामान्यांनी भटक्या कुत्र्यांची धास्ती घेतली आहे. ग्वालियर महानगरपालिकेने कुत्रे हिंसक होऊन सामान्यांना चावा घेत असल्याच्या घटनांची दखल घेतली असून हे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे.


एकट्या व्यक्तीवर करतात हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्वालियर जिल्ह्यामध्ये कुत्र्यांची दहशत इतकी आहे की दर तिसऱ्या मिनिटाला भटकी कुत्री एका व्यक्तीला चावा घेतात. ग्वालियर जिल्ह्यामध्ये या गेल्या मंगळवारी म्हणजेच 23 जानेवारीला 24 तासांमध्ये 548 जणांना चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याने दिवसभरात 548 जण सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आल्याने त्या डेटाच्या आधारेच ही माहिती समोर आली आहे. ग्वालियर शहरातील प्रत्येक गल्ली आणि चौकामध्ये भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या दिसून येतात. एकट्याने जाणाऱ्या व्यक्तीवर कुत्रे टोळीने तुटून पडतात. त्यामुळेच आता लोकांना रस्त्याने पायी प्रवास करतानाही भीती वाटत आहे.


पालिकेकडून कारवाई नसल्याचा आरोप


कुत्र्याने चावा घेतलेल्यांमध्ये सुमन नावाच्या माहिलेचाही समावेश असून तिला इंजेक्शन घ्यावं लागलं आहे. कुत्र्यांची दहशत इतकी आहे की लोक घराबाहेर पडण्याआधी अनेकदा विचार करत असल्याचं सुमनचं म्हणणं आहे. प्रत्येक गल्ली आणि चौकात कुत्रे लोकांचे चावे घेत आहेत, असंही सुमनने सांगितलं. सुमनप्रमाणेच कुत्रा चावल्याने रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल झालेल्या कमलेशने, कोणता कुत्रा कोणाला कधी आणि कसा चावेल काही सांगता येत नाही, असं म्हटलं आहे. या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी महानगरपालिका कोणतीच कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 


पालिकेला आली जाग, आता म्हणे...


ग्वालियर महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी आणि डॉग हाऊस सेंटर सुरु करण्यासाठी 2 कोटींहून अधिक निधी खर्च केला आहे. मात्र याचा कोणताच प्रत्यक्षात परिणाम दिसत नसून हा खर्च केवळ कागदोपत्री दिसत आहे. मागील 3 महिन्यांपासून कुत्र्यांचे नसबंदी सेंटर बंद आहेत. ही केंद्रं सुरु करण्यासाठी कोणतीही हलचाल केली जात नसून आता कुत्र्यांच्या हल्ल्यांची संख्या वाढल्यानंतर पुन्हा एकदा या केंद्रांचा मुद्दा चर्चेत आला आहे. महानगरपालिकेने एका महिन्यामध्ये कुत्र्यांची नसबंदी केंद्रं पुन्हा सुरु केली जातील असा दावा केला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती ग्वालियर महानगरपालिकेचे अपर आयुक्त विजय राज यांनी दिली.