भारत-पाक तणाव : काश्मीरमध्ये पर्यटक अडकलेत, पण...
जम्मू-काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक पर्यटक अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्थानिक लोक धाऊन आले आहेत. श्रीनगरचा दाल लेक, तिथे फिरणारे पर्यटक सध्या पाकिस्तान - भारत यांच्यातील तणावामुळे अडकून पडले आहेत. कारण येथील हवाई सेवा आणि रस्ते वाहतूक बंद आहे. त्यामुळे या पर्यटकांना काश्मीरच्या बाहेर पडता येत नाही. मात्र, काश्मिरी नागरिकांनी येथे आलेल्या पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांचे आदरातिथ्य केले आहे. पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये आणि कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून मोफत राहण्याची व्यवस्था केली आहे. सिमेवर तणाव असताना आणि पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरी होत असताना काश्मिरी नागरिकांना एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. त्यामुळे काश्मिरी लोकांना दहशतवाद नको तर शांतता हवी, हे त्यांच्या कृतीतून दिसून आले. तसेच पर्यटकांची काळजी घेऊन पर्यटन वाढीला चालनाही दिली आहे.
पृथ्वीवरचा स्वर्ग. काश्मीर. पण गेले काही दिवस हा स्वर्ग धुमसतोय. काश्मीरमधल्या वाढत्या तणावामुळे काश्मीरला गेलेले पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. श्रीनगरमधली विमाने बंद झाल्यामुळे अनेक पर्यटकांना काश्मीरमधून बाहेरच पडता येईना. अशावेळी स्थानिक काश्मीरींनी एक पाऊल पुढे टाकले आणि काश्मिरी आदरातिथ्याची चुणूक दाखवली. काश्मीरमधली अनेक हॉटेल्स आणि हाऊसबोटींमध्ये पर्यटकांची मोफत राहण्याची सोय करण्यात आली आहे.
काश्मीरला देशाशी जोडणारा एकमेव मार्गही बंद झाला. त्यामुळे पर्यटकांची कोंडी झाली. पण काश्मिरी जनतेच्या आदरातिथ्यामुळे आता पर्यटकांनाही काश्मीरमध्ये सुरक्षित वाटत आहे. जोपर्यंत काश्मीरमधला तणाव निवळत नाही, तोपर्यंत भारतीय पर्यटक काश्मीरमधल्या सगळ्या हॉटेल्समध्ये मोफत राहू शकणार आहेत, अशी घोषणाच करण्यात आली आहे.