सबरीमालाच्या पायथ्याशी तणावाचं वातावरण, पोलीस बंदोबस्त तैनात
मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तिथंच थांबावं लागलंय.
केरळ : केरळच्या सबरीमला मंदिर प्रवेशावरून मंदिराच्या पायथ्याशी पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालंय. सकाळच्या सुमारास ५० हून कमी वयाच्या अकरा महिला दर्शनासाठी आल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला. मंदिर प्रवेशासाठी या महिलांनी मदुराईमधून पायी यात्रा सुरू केली होती. जंगल मार्गाद्वारे आल्यानंतर मंदिरापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर विरोध करणाऱ्या भाविकांनी मज्जाव केल्याने त्यांना तिथंच थांबावं लागलंय.
पोलिसांचा बंदोबस्त
दर्शनासाठी आलेल्या या महिला चेन्नईतील मानिथि या संघटनेच्या सदस्या आहेत. मंदिरात प्रवेश मिळत नाही तोपर्यंत हटणार नसल्याचा निर्धार या महिलांनी केलाय. दुसरीकडे महिला भाविकांचा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू असताना अयप्पाचे भक्त कोट्टायम रेल्वे स्टेशनवर आंदोलन करतायत.
जवळपास ३० महिला मंदिरात दर्शनासाठी येऊ शकता याची पूर्वकल्पना पोलिसांना होती. त्यामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.