नवी दिल्ली : Maharashtra Government : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असला तरी शिंदे गटात मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दिल्लीत अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार दोघेही खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी दाखल झाले आहेत. तिघांची एकत्रित बैठक सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तार दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. 3 ऑगस्टआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा दावा सत्तारांनी केला आहे. तर येत्या 31 जुलैला अर्जुन खोतकर सिल्लोडमध्ये शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेसोबत आहे असे सांगणारे अर्जुन खोतकर आता शिंदे गटात दाखल होत आहेत.



मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, गुजरात राज्याच्या धर्तीवर विस्ताराची शक्यता व्यक्त होत आहे. दिल्लीतून भाजपच्या वरिष्ठांकडून अद्याप ग्रीन सिग्नल न मिळाल्याने शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार होऊ शकलेला नाही. आता नव्या सरकारला महिना होत येत आहे. त्याचवेळी शिंदे गट आणि शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेल्याने सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विस्तार होणार नाही, असेही बोलले जात आहे. तसेच शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मोठा संघर्ष टिपेला पोहोचला आहे. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याचीही उत्सुकता आहे.