नवी दिल्ली: देशातील हिंदू संघटनांकडून केंद्र सरकारवर राम मंदिराच्या उभारणीसाठी सातत्याने दबाव निर्माण केला जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) आक्रमक पवित्र्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनीही ही मागणी उचलून धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नवा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी ट्विट करून राम मंदिर उभारण्यासाठीचे पाच मार्ग सरकारला सांगितले आहेत. यापैकी पहिल्या पर्यायात स्वामी यांनी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी नरसिंह राव यांच्या सरकारला राम मंदिराविषयी भूमिका स्पष्ट करण्यात सांगितली होती. त्यावर राव यांनी म्हटले होते की, अयोध्येतील जागेवर पहिल्यापासून मंदिर असेल तर ही जमीन हिंदुंना मिळायला हवी. न्यायालयाच्या आदेशानंतर पुरातत्त्व खात्याने केलेल्या सर्वेक्षणात येथील जमिनीखाली मंदिराचे अवशेष आढळून आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसऱ्या पर्यायानुसार, ज्याठिकाणी रामलल्लाचा जन्म झाल्याची श्रद्धा आहे, तेथे प्रार्थना करण्याचा अधिकार हिंदुंना आहे. याउलट नमाज पढण्यासाठी विशिष्ट जागेची गरज असतेच असे नाही. त्यामुळे बाबरी मशीद दुसरीकडे उभारता येणे शक्य आहे. 


...तर लोक स्वत: राम मंदिर बांधायला सुरुवात करतील- रामदेव बाबा 


तिसऱ्या पर्यायानुसार, एखाद्या मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठापणा झाल्यानंतर ते नष्ट झाले तरी त्याठिकाणी ईश्वराचे अस्तित्व कायम असते. तर चौथ्या पर्यायात स्वामी यांनी म्हटले आहे की, सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले पाहिजे की, नरसिंह राव यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार ही जमीन राम मंदिराच्या उभारणीसाठी हिंदू धर्म आचार्य सभेकडे सोपवली पाहिजे. यानंतरच्या अंतिम पर्यायात स्वामी यांनी बाबरी मशिदीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. डॉ. आंबेडकर नगरातील मुस्लीम वस्ती असणाऱ्या परिसरात शिया वक्फ बोर्डाला बाबरी मशीद उभारण्यासाठी भूखंड द्यावा, असे स्वामी यांनी सांगितले. जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अयोध्या खटल्यावर पुन्हा सुनावणी होईल. त्यावेळी सरकार यापैकी एकतरी पर्याय विचारात घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


...तर १० दिवसांत राम मंदिराचा निकाल लागेल- अमित शहा