नवी दिल्ली: काँग्रेसच्या सध्याच्या काळात राहुल गांधी यांनी मैदानात उभे राहून लढण्याची गरज होती. मात्र, अशावेळी ते मैदानातून पळ काढत असल्याची टीका भाजपचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. राहुल यांच्या या कृतीमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काय वाटेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल यांनी लगेचच राजीनामा दिला होता. मात्र, त्यावर अजूनही निर्णय घेतला गेला नसून केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरु आहे. राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारला, असे एव्हाना काँग्रेसने सांगितले पाहिजे होते. मात्र, पक्षातील एकाही नेत्याकडे तेवढी हिंमत नाही. राहुल गांधी म्हणतात की देश अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. मग अशावेळी ते मैदान सोडून पळ कसा काढू शकतात? ते पळपुटे आहेत, घाबरट आहेत. जे कार्यकर्ते राहुल गांधी यांच्याकडे नेता म्हणून पाहत असतील त्यांना यामुळे काय वाटले असेल, असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी विचारले. 


मी अध्यक्षपद सोडलेय, तातडीने नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजयी झाले होते. तर अमेठीमध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितले आहे.