Success Inspirational Story: दोन भावांनी मिळून उद्योग सुरु केल्याची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील किंवा त्याबद्दल वाचलं असेल. मात्र उद्योग सुरु करणं म्हणजे मोठी जागा, आर्थिक पाठबळ यासारख्या गोष्टी आल्याच. मात्र हरियाणामधील दोन भावांनी चक्क 225 स्वेअर फूटांच्या फ्लॅटमधून कोट्यवधींची कमाई करत आहेत. या भावांचं नावं आहे नवीन सिंधू आणि प्रवीण सिंधू!


एक भारतात एक युनायटेड किंग्डममध्ये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन सिंधू हा युनायटेड किंग्डममध्ये हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत असतानाचा त्याच्या भाऊ प्रवीण सिंधू हा भारतात एमटेकचं शिक्षण घेत होता. मात्र त्याचवेळेस हे दोघे काश्मीरमध्ये घेतल्या जाणाऱ्या केशरची शेती कशी करतात याचा अभ्यासही करत होते. केशर मसल्याचा जगातील सर्वात महागडा पदार्थ आहे. काश्मीरमधील थंड हावामानामध्ये पिक घेतलं जाणारं केशर हरियाणामध्ये कसं घेता येईल याचा अभ्यास सिंधू भावंडांनी केला. 


कशी सुचली कल्पना


"माझा भाऊ प्रवीण याने वृत्तपत्रामध्ये केशरची घरातच शेती कशी करता येईल याबद्दल वाचलं होतं. हा प्रयोग करुन पाहण्याची त्याची इच्छा होती. त्याने 2016 मध्ये एमटेकची पदवी घेतल्यानंतर आम्ही दोघांनी यावर काम करण्याचं ठरवलं," असं धाकटा भाऊ असलेल्या नवीनने सांगितलं. यावेळेस प्रवीण थायलंडमध्ये प्रशिक्षणासाठी गेला. आरोग्य विषयक वापरासाठी प्रसिद्ध असलेल्या मशरुमची घरच्या घरी शेती कशी करता येईल याबद्दलचं प्रशिक्षण घेण्यासाठीच प्रवीण थायलंडला गेला होता. 


मागणी जास्त पुरवठा कमी


"2017 साली वर्षभराने मी परत आल्यावर आम्ही जम्मू-काश्मीरमधील पॅमपोरे भागाला भेट दिली. केशरची शेती कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी तिथे आम्ही दोन महिने थांबलो," असं प्रवीणने सांगितलं. जगातील सर्वाधिक केशर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भागांमध्ये पॅमपोरेचा समावेश होतो. भारतातील 90 टक्के केशर याच भागात पिकवलं जातं. "तिथे आम्ही शेतकऱ्यांशी बोललो. त्यांच्याकडून केशर लागवड कशी करतात हे शिकून घेतलं. तेथील स्थानिक कृषी विद्यापीठालाही आम्ही भेट दिली," असंही प्रवीणने '30 स्टेड्स' या वेबसाईटशी बोलताना सांगितलं.


ट्रेण्ड वाढतोय


त्यानंतर 2018 साली प्रवीण आणि नवीनने त्यांच्या राहत्या घराच्या गच्चीवर असलेली न वापरत्या खोलीमध्ये पाणी आणि मातीचा वापर न करता केशराचं उत्पादन घेण्याचं ठरवलं. ज्याप्रमाणे छोट्याश्या खोलीमध्ये मशरुमचं उत्पादन घेतलं जातं तसेच केशर पिकवायचं या दोन भावांनी ठरवलं. केशर हा सर्वात महागडा मसल्याचा पदार्थ असल्याने तो शेतात उत्पादन घेताना फार काळजी घ्यावी लागते. त्यामुळेच आता बंद ठिकाणी केशरचं उत्पादन घेण्याचा ट्रेण्ड वाढताना दिसतोय. केशराची मागणी वाढत असतानाच त्याचा पुरवठा मर्यादीत असल्याने या असल्या प्रयोगातून यश मिळवता येतं असं अनेकांना वाटत असून त्यामधूनच याकडे अनेकजण वळत आहेत.


खास रुम कशी तयार केली? खर्च किती आला?


"आम्ही 15 बाय 15 ची रुम वापरली. आम्ही या ठिकाणी तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी चिलर (कूलरसारखं यंत्र), आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी ह्युमिडीफायर आणले. झाडांना पौष्टीक वातावरण मिळावं या दृष्टीने इतर उपाययोजना केल्या. ज्यामध्ये सूर्यप्रकाश झाडांना मिळेल अशी सोय केली. लाकडांच्या ट्रेमध्ये आम्ही केशाराच्या झाडांची रोपं ठेवली," असं नवीनने सांगितलं. केशराच्या बिया वगळल्या तर या खोलीमध्ये सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यासाठी एकूण 6 लाखांचा खर्च या भावांनी केला. त्यानंतर या दोघांनी 3500 रुपये किलो दराने काश्मीरमधून 100 किलो केशराचं बियाणं मागवलं. ही ऑर्डर त्यांनी ऑनलाइन दिली होती. "हे बियाणं पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याने ते पूर्णपणे खराब झालं. आमचा पैसा फुकट गेला. आम्ही 2019 मध्ये स्वत: काश्मीरला जाऊन बियाणं घेऊन आलो," असं नवीनने सांगितलं. यावेळेस त्यांना 2500 रुपये प्रती किलो असा दर मोजावा लागला. त्यांनी 100 किलो बियाणं विकत घेतलं. "या बियाणांपासून चांगलं उत्पादन मिळालं. मात्र तो पहिला लॉट आम्ही प्रयोगासाठीच वापरला. आम्ही ते केशर केवळ कुटुंबातील लोकांना आणि मित्रांना वाटलं. त्यामधून आम्ही पैसे कमावले नाहीत," असं नवीनने सांगितलं. केशर चांगल्या प्रतीचं असल्याचं समजल्यानंतर या दोघांनी पुढल्या वर्षी 1500 रुपये प्रती किलो दराने 700 किलो बियाणं मागवलं.  "आम्ही इतक्या वर्षात तयार केलेल्या नेटवर्कमुळे आम्हाला कमी दरात बियाणं मिळालं. यावेळेस आम्ही व्यापाऱ्याच्या माध्यमातून बियाणं मागवलं नाही. आता सध्या या केशराच्या बियाणांच्या बल्बची किंमत दिवसोंदिवस वाढत आहे," असं प्रवीणने सांगितलं. 700 किलो बियाणामधून या भावांनी 225 स्वेअर फुटांचा रुममध्ये 1000 किलो केशर मिळेल अशा पद्धतीने लाकडी ट्रेमध्ये बल्बमध्ये रोपांची लागवड केली. 


एका किलोची किंमत 5 लाख रुपये


"2 बाय 2 च्या लाकडी ट्रेमध्ये पाच किलो बियाणं मावतं. हे ट्रे एकावर एक ठेवण्यात आले. सूर्यप्रकाशाला पर्याय म्हणून ग्रो लाइट्सचा वापर आम्ही केला," असं नवीन सांगतो. त्यावेळी त्यांनी उत्पादन घेतलेलं अर्धा किलो केशर अडीच लाखांना विकलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नवीनच्या सांगण्यांनुसार, मागील वर्षी यांनी 2 किलो केशराचं उत्पादन घेतलं आणि त्यामधून 10 लाख रुपये कमवले आणि ते सुद्धा या 225 स्वेअर फुटांच्या खोलीतूनच.


परदेशात पाठवतात केशर


सध्या सिंधू भावंडे 'अमरत्व' या ब्रॅण्ड नेमखाली हे केशर 5 लाख रुपये किलो दराने विकतात. ते अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि इतर देशांमध्ये निर्यात करण्याबरोबरच भारतातही केशरची विक्री करतात.